वैभववाडी : मारुती कांबळे
वर्षभरापूर्वीच करूळ घाटातील संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे घाट मार्ग सुसाट झाला असला, तरी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. गेल्या पावसाळ्यातही दरडी कोसळल्यामुळे १० दिवस वाहतूक बंद ठेवून दरडींना जाळी बसवण्याचे काम करावे लागले होते.
तर काही ठिकाणी संरक्षक भिंती कमकुवत आहेत. त्या कोसळण्याचा धोकासुद्धा आहेच. त्यामुळे या पावसाळ्यातही वाहनचालक व प्रवाशांना जपून प्रवास करावा लागणार आहे. या घाटातील संपूर्ण रस्ता रुंदीकरण करून कॉक्रिटीकरण करण्यात आला आहे, तर संपूर्ण घाटात संरक्षक भिंती, आधार भिंती, क्रॅश बॅरियर, नवीन गटारे, पाच ठिकाणी दरडीवर संरक्षक जाळी बसविण्यात आल्या आहेत.
त्यामुळे गेल्या कित्येक वर्षानंतर प्रथमच घाट रस्ता सुपरफास्ट झाला आहे. मात्र, पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींचा धोका मात्र कायम आहे. तब्बल १०-१५ ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. संपूर्ण घाट मार्गात काँक्रीट गटर बांधण्यात आली आहेत. मात्र, गटार बांधताना असताना दरडीपासून काही अंतरावर पुढे बांधल्यामुळे डोंगरातून येणारे पाणी थेट गटारात न येता रस्त्याच्या आतमध्ये मुरून भविष्यात रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी बांधलेल्या संरक्षक भिंती जुन्या दगडी संरक्षक भिंतीवरच बांधल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी या जुन्या दढासळलेल्या आहेत. संततधार पावसामुळे दगडाची भिंत ढासळल्यास त्याबरोबर नवीन बांधलेली संरक्षण भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गगनबावडापासून सुमारे लांब वाहने या ठिकाणी अडकत असून अवजड व जड वाहनांना हे वळण धोकादायक ठरत आहे. यापूर्वी अनेक वेळा याठिकाणी अपघात घडले आहेत. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे.
दरड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी 'NAHI' कडे प्रस्ताव
गेल्यावर्षी पाच ठिकाणी संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी जाळी बसवण्यात आली असून, आणखी दहा अशी धोकादायक दरडी कोसळणारी ठिकाणे आहेत. या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली येथे सादर करण्यात आला आहे. देशातील सर्व नॅशनल हायवेचे डिझाईन करण्याचे काम करणारे एक्सपर्ट याचे डिझाईन करून त्यानंतर या कामाला मंजुरी मिळणार आहे. हे प्रस्तावित काम होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
पावसाळ्यात घाटमार्गाची २४ तास निगराणी
या घाटमार्गाची पुढच्या दहा वर्षांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही ठेकेदार कंपनीची आहे. पावसाळ्यात घाटमार्गात कोसळणाऱ्या दरडी व आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी २४ तास यंत्रणा कार्यरत असणार असून जेसीबी, ट्रॅक्टर, तैनात ठेवण्यात येतील. तसेच घाट रस्त्यातील सर्व गटारे व मोऱ्याची साफसफाई करण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी किरकोळ उपाययोजना करून घाट मार्ग सुरळीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली
घाटात अत्यावश्यक ठिकाणी ड्रम टाईप लोखंडी बॅरिकेट
करूळ घाटात अत्यावश्यक ठिकाणी सुमारे एक किलोमीटर लांबीचे ड्रम टाईप लोखंडी बॅरिकेट बसवण्यात येणार आहेत. जेणेकरून अपघातावेळी वाहन या बॅरिकेटला अडले जाईल. तसेच घाटातील नागमोडी वळणात समोरून व मागून येणारे वाहन दिसावे यासाठी काही ठिकाणी आरसे बसवण्यात येणार आहेत.