

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट जाणाऱ्या वाहनांना सुरक्षित मार्ग मिळावा आणि स्थानिक गावकऱ्यांची गैरसोय टळू नये म्हणून करोडो रुपये खर्चून सर्विस रोड तयार केले जातात. मात्र, जळगाव-भुसावळ मार्गावरील तरसोद आणि नशिराबाद जोडणाऱ्या सर्विस रोडला चक्क वाहन शोरूमधारकांनी बापाची जहागीर समजून 'पार्किंग झोन' बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ (NH 56) च्या चौपदरीकरणांतर्गत झालेल्या या सर्विस रोडवर शोरूम चालकांनी ग्राहकांच्या चारचाकी गाड्या थाटात उभ्या केल्या असून, यामुळे सर्वसामान्य वाहनधारक आणि लहान मुलांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यावर शोरूमचा 'रुबाब'
जळगाव शहराबाहेरून नशिराबाद आणि भुसावळच्या दिशेने जाण्यासाठी आणि मुख्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ ला जोडण्यासाठी हा सर्विस रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. तरसोद आणि नशिराबाद या दोन्ही गावांतील नागरिकांना मुख्य हायवेवर ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. परंतु, या रस्त्यावर असलेल्या बड्या वाहन शोरूमधारकांनी प्रशासकीय नियमांना केराची टोपली दाखवली आहे. पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा, नगरपालिका किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने हा रस्ता जणू त्यांच्याच ग्राहकांच्या पार्किंगसाठी लिहून दिला आहे अशा रुबाबात शोरूम चालक तिथे गाड्या पार्क करून घेत आहेत. या अनधिकृत पार्किंगमुळे मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांना वळण घेताना कसरत करावी लागत आहे. त्यातच स्थानिक लहान मुले आणि पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
सुरक्षा यंत्रणा गायब: संबंधित शोरूमधारकांनी रस्त्यावर गाड्या लावूनही तिथे वाहतूक नियंत्रणासाठी किंवा सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक नेमलेला नाही.
यंत्रणांचे दुर्लक्ष: हायवेवरून वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे या सर्विस रोडवर कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर इथे एखादा मोठा अपघात झाला, तर या निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण? शोरूमचालक की ढिम्म प्रशासन? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या गंभीर कोंडीबाबत आणि शोरूमधारकांच्या मुजोरीबाबत 'नशिराबाद पोलीस ठाण्याशी' संपर्क साधला असता, त्यांनी नेहमीप्रमाणे 'आता आम्ही गाडी पाठवून तो रस्ता मोकळा करायला सांगतो' असे तोंडदेखले उत्तर देऊन वेळ मारून नेली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त वाहनधारकांमध्ये नवा प्रश्न उपस्थित होत आहे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) किंवा पोलीस प्रशासनाने हे रस्ते गावकऱ्यांसाठी बनवले आहेत की शोरूमधारकांना आंदण दिले आहेत? तात्पुरती कारवाई न करता या शोरूम चालकांवर गुन्हे दाखल करून हा रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा, अशी मागणी आता नशिराबाद आणि तरसोदच्या गावकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.