पोलादपूर ; पुढारी वृत्तसेवा – मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कशेडी पोलीस मदत केंद्र चेक पोस्ट जवळ २०० मीटर यू टर्न उतारावर केमिकल वाहतुकीच्या टँकरला अपघात झाला. ही दुर्घटना शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबईकडून खेड दिशेने जाणारा टँकर क्रमांक GJ-15/AV/4730 हा 2,5 Di CHLORO ANILINE केमिकल घेऊन चालला होता. घाटातील उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी संरक्षक भिंतीला आदळली. या अपघातामध्ये गाडीवरील केमिकल टाकी गाडीपासून वेगळी होऊन दरडीमधून घसरत जाऊन खालील रस्त्यावर जाऊन पडली. यावेळी सुदैवाने खालून येणाऱ्या रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान टँकर चालक सुगरीव श्रीनगीना यादव (वय-32 रा.जिगणी बाजार पो.करजहा जि.गनीभार देवरिया बैतालपूर,उत्तर प्रदेश) हा केबिनमधून बाहेर फेकला गेला. टँकरमधून प्रवास करणारे प्रवासी संदीप रमेश कुमार, (वय २९) राहणार बिरवाडी महाड यास डोक्याला गंभीर दुखापत झाली. गौरव भालेराव कश्यप (वय२८), बिरवाडी महाड याच्या हाताला दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे, सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. अपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती.
हेही वाचा :