PFI Target PM Modi : पीएफआयने रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट | पुढारी

PFI Target PM Modi : पीएफआयने रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PFI Target PM Modi) यांच्या हत्येचा कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासातून समोर आली आहे. मोदी यांच्या १२ जुलै रोजी आयोजित पाटण्यातील रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. त्याचबरोबर यूपीमधील संवेदनशील ठिकाणांवर आणि व्यक्तींवर हल्ले करण्यासाठी दहशतवादी मॉड्यूल आणि प्राणघातक शस्त्रे वापरण्याची योजना आखण्यात आल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.

केरळमधून गुरुवारी अटक केलेल्या पीएफआय सदस्य शफिक पायथच्या विरोधात ईडीने आपल्या रिमांड नोटमध्ये असा खळबळजनक दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन महिन्यांपूर्वी १२ जुलै रोजी पाटणा दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यासाठी पीएफआयचे टेरर मॉड्यूल धोकादायक शस्त्रे आणि स्फोटके गोळा करण्यात (PFI Target Modi) गुंतले होते.

जुलैमध्येही पाटणा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये ‘इंडिया 2047’ नावाची पीएफआय पुस्तिका आढळून आली होती. त्यात 2047 पर्यंत भारताला मुस्लिम देश बनवण्याची ‘दहशतवादी ब्लू प्रिंट’ होती. संघटनेच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित केल्याचा संशय आहे. वेगवेगळ्या माध्यमातून इस्लाम धर्माचा प्रचार करून 2047 मध्ये संपूर्ण देश मुस्लिम राष्ट्र करण्याचे लक्ष्य ठेवण्याचा संदेश या पुस्तकातून दिला आहे. त्यासाठी उच्चशिक्षित आरोपींकडून शिबिरांतून प्रशिक्षण देण्याचे काम केले होते.

कतारचा रहिवासी असलेला शफीक पायथवर आपल्या एनआरआय खात्याचा परदेशातून पीएफआयमध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी बेकायदेशीर वापर करता होता, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. ईडीने जेव्हा पेएथच्या घरावर छापा टाकला. तेव्हा रिअल इस्टेट व्यवसायातील गुंतवणूक आणि ते पैसे पीएफआयमध्ये वळवल्याचा खुलासा झाला आहे. गेल्या काही वर्षांत पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संस्थांच्या खात्यांमध्ये 120 कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याचे ईडीने म्हटले आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button