strike msrtc : महाड एसटी आगारात चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

strike msrtc : महाड एसटी आगारात चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

महाड; पुढारी वृत्तसेवा : strike msrtc : गेल्या अनेक दहा दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांचा संप सुरू आहे. अशातच मानसिक तणावाखाली आलेल्या महाड आगारातील चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधनाने चालकाचे प्राण वाचले. विश्रामगृहाच्या वर असणा-या गच्चीवर आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली.

या संदर्भात एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. २०) सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास (मूळचे सातारा) येथील असणा-या एका चालकाने मानसिक तणावाखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास महाड एसटी आगारातील विश्रामगृहाच्या वर गच्चीवर जाऊन गळफास लावून जीवन संपवण्याचा त्याने प्रयत्न केला. ही घटना निदर्शनास येताच ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षक संतोष एस गायकवाड यांनी तातडीने त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. तसेच गच्चीवरून तातडीने खाली आणून आगार व्यवस्थापकांना याबाबतची माहिती दिली. यानंतर महाड शहर पोलिस ठाण्यात संबंधित चालकाला महाड एसटी आगाराचे अधिकारी येऊन गेले असून त्याठिकाणी त्याचा जाब जबाब घेण्याचे काम सध्या सुरू असल्याचे या अधिका-यांनी प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

यानंतर संबंधित चालकास त्याच्या सहका-यांनी समजावून सांगत असा प्रयत्न पुन्हा करू नये अशी विनंती केली. मात्र आपण मानसिक ताण तणावाखाली असल्याने त्या स्थितीमध्येच आपल्याकडून ते घडवून गेल्याचे संबंधित चालकाने पोलिसांसमोर स्पष्ट केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यभरात सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या संपादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले असतानाच महाड आगारामध्ये अशाप्रकारचा झालेला हा दुर्दैवी प्रकार धक्कादायक आहे. संबंधित चालक व एसटी आगाराचे अधिकारी महाड शहर पोलिस ठाण्यात असून या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याचे पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडूनस्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button