रायगड : महाड येथे आमदार गोगावले यांच्या वक्तव्यावरून शिंदे गट – ठाकरे गट एकमेकांना भिडले

रायगड : महाड येथे आमदार गोगावले यांच्या वक्तव्यावरून शिंदे गट – ठाकरे गट एकमेकांना भिडले

महाड;  पुढारी वृत्तसेवा : महाडचे आमदार भरत गोगावले यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. दरम्यान, महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गट आणि  ठाकरे गट आज (दि.२२)  आमनेसामने आले. यामुळे वातावरण तणाव पूर्ण बनले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने  मोठा संघर्ष टळला. दरम्यान, या ठिकाणी ठाकरे महिला आघाडीकडून छत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्याचा केलेला प्रयत्न शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून हाणून पाडला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून आणलेला पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अर्पण करण्यात आला.

ठाकरे गटाकडून आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार गोगावले यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार होते. या आंदोलनाची खबर लागताच शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काही वेळानंतर आलेल्या पोलिसांनी राज्यात जमाव बंदीचा आदेश असल्याने कोणतेही प्रकारचे आंदोलनात्मक कृती करू नये, असे आवाहन केले. तर डीवायएसपी श्रीशंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व शीघ्रकृती दलाने संयमी भूमिका घेत कार्यकर्त्यांची समजूत घातली.

 ठाकरे गटाचे जिल्हा नेते धनंजय उर्फ बंटी देशमुख यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणतेही बेताल वक्तव्य सहन करणार नसल्याचा इशारा दिला. तसेच  आमदार गोगावले यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.

महिला आघाडीच्या श्रीमती रत्नपारखी यांनीदेखील आपणाला छत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्यात केलेल्या अडथळ्याबद्दल शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी व आमदारांचा निषेध केला. शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून करण्यात आलेला विरोध हा हिंदुत्ववादी विचारांना विरोध असल्याचे सांगून त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.

दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी आमदार गोगावल्यांच्या विरोधात करण्यात येणाऱ्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेण्यात येईल व भविष्यकाळात जशास तसे उत्तर देण्यात येईल, अशा सूचक शब्दांत इशारा दिला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news