कोल्हापूर: पुणे- बंगळूर महामार्गावर पिलर टाकण्यासाठी गुरूवारी काम रोखणार; घुणकीतील शेतकऱ्यांचा इशारा | पुढारी

कोल्हापूर: पुणे- बंगळूर महामार्गावर पिलर टाकण्यासाठी गुरूवारी काम रोखणार; घुणकीतील शेतकऱ्यांचा इशारा

किणी, पुढारी वृत्तसेवा: पुणे- बंगळूर महामार्गावरील वारणा नदी पूल ते घुणकी फाटा दरम्यानच्या रस्त्यावरील भराव काढून पिलर पध्दतीने उड्डाणपूल करावा, या मागणीसाठी गुरुवारी (दि.२८) सहापदरी करणाचे काम बंद पाडण्याचा निर्णय घुणकी (ता. हातकणंगले) येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

शेंद्रे (सातारा) – कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. वारणा नदी पुल ते घुणकी फाटा दरम्यान उड्डाणपुलाची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार करुनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. घुणकी फाटा ते वारणा नदीच्या पुलादरम्यान ५० फूट व त्यापेक्षा जास्त उंचीपर्यंतचा भराव आहे. महामार्गावरील या भरावामुळे घुणकी, चावरे, तळसंदे, पारगांव, निलेवाडी तसेच सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी, कुंडलवाडी, ऐतवडे, चिकुर्डे या गावामध्ये पुरामुळे शेतीचे तसेच घरांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. तसेच भरावामुळे पूर लवकर ओसरत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. समृध्द असणारी वारणा काठची जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. घुणकी फाटा ते वारणानदीच्या पुलापर्यंत कॉलम पिलर पध्दतीने रस्त्याचे काम करण्यासह दोन्ही बाजूला सेवा रस्ता करण्याची वारंवार सूचना व मागणी करण्यात आली, त्यालाही केराची टोपली दाखविण्यात आली. खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राजू आवळे यांनी अधिकाऱ्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.

त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पण कोणताही प्रतिसाद न दिल्याने गुरुवारी घुणकी येथील राधाकृष्ण मंदिरात बैठक घेण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही सूचना न देता गुरुवारी (दि. २८) काम बंद पाडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच होणाऱ्या नुकसानीस प्राधिकरणचे अधिकारी जबाबदार राहतील, असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला.

यावेळी वारणा कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, ग्रामपंचायत सदस्य विकास जाधव, माजी सदस्य पांडुरंग जाधव, प्रकाश जाधव, मोहन जाधव, अशोक नांगरे-पाटील, आनंदराव निकम, शब्बीर मुल्ला, निवास परीट, जयकर नाईक, प्रकाश बुढ्ढे, संजय जगताप, सतीश मोरे, सुनील डाळे, योगेश शेवाळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button