Kolhapur News : रिप्लेक्टर अभावी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे अपघातांचा धोका; साखर कारखान्यांचा डोळेझाकपणा | पुढारी

Kolhapur News : रिप्लेक्टर अभावी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे अपघातांचा धोका; साखर कारखान्यांचा डोळेझाकपणा

टी. एम. सरदेसाई

बिद्री : जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रक, टॅक्टर-ट्रॉली, छकडी, बैलगाडी आदी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रस्त्यावरून ऊस भरून जाणारी वाहने रात्रीच्या वेळी रिप्लेक्टर अभावी दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. परिणामी वाढत्या अपघातामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्वच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे. यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. Kolhapur News

संबंधित बातम्या

 

जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्याचे गळीत हंगाम जोरात सुरू आहेत. साखर कारखाना किंवा गु-हाळ घरे यांना ट्रक, टॅक्टर-ट्रॉली, छकडी, बैलगाडी आदी वाहनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरु आहे. अनेक वाहनांना रिप्लेक्टर किंवा रेडियम लावले नसल्यामुळे ऊस भरून जाणारी वाहने रात्रीच्यावेळी दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अंधाऱ्या रात्री काहीवेळा ऊस वाहतूक करणारी वाहने नादुरुस्त किंवा काही कारणांनी रस्त्यावर थांबून राहतात. रस्त्यावरून पाठीमागून येणार्‍या चालकांना अंधार्‍या रात्री ही वाहने नीट दिसत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा अपघात घडले आहेत.

ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांना स्वयंप्रकाशित होईल, अशी कोणतीही व्यवस्था नसते. बैलगाड्यांचा वेगही मर्यादित असतो. त्यामुळे मागून येणाऱ्या सुसाट वाहनांचा वेग अचानक कमी करताना चालकांना कसरत करावी लागते. यातून ही अपघात घडतात. यामुळे बैलगाडीसह सर्व ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिप्लेक्टर , रेडियम लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
त्याचबरोबर ऊस वाहतूक करणारे विशेषतः टॅक्टर चालक मोठ्या आवाजात गाणी लावून वाहने चालवितात. उसाची ओव्हर लोड वाहतूक करतात. त्यामुळे वाहने पलटी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्यावर ही कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधित साखर कारखाने व आरटीओ विभागाने त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.

अनेक ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिप्लेक्टर नसल्यामुळे अपघात घडत आहेत. वाहन चालकांना रात्री अशी ऊस वाहने जवळ आल्याशिवाय दिसत नाहीत. त्यामुळे सर्व ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिप्लेक्टर बसविणे गरजेचे आहे. संबंधित साखर कारखान्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

– बाळासाहेब पाटील संभाजी ब्रिगेड, विभागीय अध्यक्ष

अनेक साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिप्लेक्टर लावण्याबाबत कळविले आहे. मात्र, अनेक कारखान्यांनी याकडे गांभिर्याने बघितलेले नाही. त्यामुळे आमच्या कार्यालयामार्फत कापडी रिप्लेक्टर स्टिकर बसविण्यात येणार आहेत. त्याबाबत कार्यवाही सुरु असून आठ-दहा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करणार आहोत. बैलगाड्यांना ही रेडियम स्टिकर बंधनकारक असणार आहे.

– दीपक पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

Back to top button