रायगड: नागोठणे रेल्वे स्थानकात चाकरमानी अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण | पुढारी

रायगड: नागोठणे रेल्वे स्थानकात चाकरमानी अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण

महेंद्र माने

नागोठणे : येथील रेल्वे स्थानकात आज (दि.१) सकाळी ७ च्या सुमारास कुडाळ गणपती एक्स्प्रेस बराच वेळ अडकल्याने चाकरमान्यांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही सूचना किंवा माहिती न मिळाल्याने प्रवाशांचे हाल झाले. यावेळी नागोठणे पोलिसांनी रेल्वे स्थानकात जाऊन प्रवाशांना योग्य सूचना दिल्या. व स्टेशन मास्टर बरोबर चर्चा करून रेल्वे प्रशासनाकडून प्रवासांना पनवेलपर्यंत जाण्याची व्यवस्था केली.

शनिवारी रात्री १० वाजता रत्नागिरीवरून सुटलेली कुडाळ गणपती एक्स्प्रेस अनेक स्थानकात थोडा थोडा वेळ थांबत थांबत आज सकाळी ७ च्या सुमारास नागोठणे स्थानकात आली. बराच वेळ गाडी सुटत नसल्याने काही प्रवाशी इतर वाहनांनी पुढील प्रवासासाठी निघून गेले. बाकी उर्वरित प्रवाशांना साधारण 6 ते 7 तास गाडी स्थानकात का थांबली याची कोणतीही कल्पना रेल्वे स्थानकातून देण्यात आली नाही. त्यातच रेल्वेमधील पाणी संपले व काही डब्यातील पंखे बंद पडल्याने थोडा वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती नागोठणे ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांना मिळताच त्यांनी तातडीने गणेश भोईर, नितीश पाटील, रामनाथ ठाकूर व स्वप्नील भालेराव या सहकार्‍यांसह रेल्वे स्थानकात धाव घेतली. त्यांना नाष्टा व पाण्याची व्यवस्था केली.

त्यानंतर रेल्वे स्टेशन मास्टर यांच्याबरोबर चर्चा करून प्रवाशांना पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली. दुपारी २.३० वाजेपर्यंत स्थानकात अडकलेल्या काही चाकरमान्यांना दोन एसटी बसमधून पनवेलकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर ३ च्या सुमारास गाडी पुढे रवाना होणार असल्याची सूचना मिळाल्याने बाकी उर्वरित प्रवाशी रेल्वे गाडीने पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

हेही वाचा 

Back to top button