लालपरी थांबली; महाड पोलादपूर आगारात १०० टक्के बंद! | पुढारी

लालपरी थांबली; महाड पोलादपूर आगारात १०० टक्के बंद!

महाड ; पुढारी वृत्‍तसेवा

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाड पोलादपूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी आज (सोमवार) पहाटेपासून आपलं काम बंद करून आंदोलन पुकारल्याने लालपरी थांबली. आगारातून आज एकही एसटी बस रवाना झाली नाही. ऐन  दिवाळी सनात लालपरी थांबली. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आमचे काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान पोलादपूर येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या डेपोमध्ये असलेल्या सर्व गाड्या महाड मुख्य कार्यालयामध्ये जमा केल्याची माहिती दिली आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी एसटी महामंडळाच्या ३५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता कर्मचाऱ्यांची मुलेही आत्महत्या करू लागली आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संवेदनशील बनले आहे.

महाड एसटी आगारातून दररोज लांब पल्ला आणि लोकल अशा २५२ फेऱ्या सोडल्या जातात. मात्र आज पहाटे पासून एकही बस बाहेर रवाना झाली नाही. दिपावली सणासाठी मोठ्या संख्येने नोकरदार मंडळी आपल्या कुटुंबियांसह गावी आलेली होती. या मंडळीनी रविवारी रात्रीपासूनच महाड स्थानकात गर्दी केली होती. मात्र रविवारी मध्यरात्री पासूनच कोकणातून बाहेर जाणाऱ्या बसेसची संख्या कमी आणि येणाऱ्या बसेस फुल भरून येत असल्याने रात्रीपासून महाड स्थानकातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

एसटी सेवा बंद असल्याने खासगी वाहतूकदारांची चंगळ उडाली होती. त्यांच्याकडून प्रवाशांची लुटमार सुरु झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या नव्याने बंदचा जोर पाहता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता कर्मचारी वर्गातून व्यक्त होऊ लागली आहे.

Back to top button