Raigad Maratha Andolan : रायगड जिल्ह्यात मराठा आरक्षण प्रश्नी ठिकठिकाणी बंद, मोर्चे | पुढारी

Raigad Maratha Andolan : रायगड जिल्ह्यात मराठा आरक्षण प्रश्नी ठिकठिकाणी बंद, मोर्चे

पोलादपूरमध्ये कडकडीत बंद

पोलादपूर; समीर बुटाला : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील उपोषणकर्ते व मराठा समाजाच्या भगिनी व बांधव यांच्यावर पोलिसांनी लाठीमार करत आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ पोलादपूर तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे पोलादपूर आज कडकडीत बंद ठेवण्यात आले. यावेळी महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्यापासून रॅली सुरू झाली, बाजारपेठ मार्गे महामार्ग व पोलादपूर तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाचा निषेध करत एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या. तसेच महाड तालुक्यातील राजेवाडी येथील गोवंश हत्येचा निषेध करत गोरक्षक याच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याची विनंती करण्यात आली. जालना येथील आंतरवाली, सराटी गावात लाठीहल्ला करणाऱ्या पोलीसांचा निषेध करण्यात आला. या घटनेची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारून सदर प्रकारात दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करू, त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकरची असेल, असे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसील कार्यलयामार्फत देण्यात आले. या आंदोलनात चंद्रकांत कळंबे, प्रकाश कदम, सुनील मोरे, अनंत पार्टे, रामचंद्र साळुंखे, लक्ष्मण मोरे, दपर्ण दरेकर, अनिल भोसले, अनिल नलावडे, अमोल भुवड, अनिल दळवी यांच्यासह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.

महाड सकल मराठा समाजामार्फत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

महाड; पुढारी वृत्तसेवा : जालना लाठीमार घटनेच्या निषेधार्थ महाड सकल मराठा समाजामार्फत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाड शहरातील विक्रम रिक्षा वाहतूक तसेच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

महाड सकल मराठा समाज बांधवांतर्फे सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर चवदार तळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मोर्चा तांबट अळी बाजारपेठ येथून प्रांत अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. जालना घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महाड सकल मराठा समाजातर्फे याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय, आरक्षण जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुला होता.

हेही वाचा : 

Back to top button