जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तसंच पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत जाहीर माफी मागितली. फडणवीस यांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज (दि.५) जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी शरद पवारांचे जळगाव शहरात आगमन झालं आहे. त्यांनी अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला. याप्रसंगी शरद पवार यांनी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले की आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वाढवण्याची गरज आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं योग्य नाही. असं शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत.
दरम्यान, सभेआधीच शरद पवारांचं शहरात भव्य दिव्य स्वागत करत शरद पवार गटातर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शहरात शरद पवार यांच्या आगमन होताच तब्बल पाच जेसीबीवरुन पुष्पवृष्टी तसेच तब्बल सहा क्विंटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
दिग्गज नेत्यांच्या हजेरी
जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर आज दुपारी तीन वाजता शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांची ही पहिली सभा आहे. सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहीत पवार, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह अनेक दिग्गज देते शहरात तळ ठोकून आहेत.
ओबीसीच्या कोट्यातून मराठा आरक्षण दिल्यास ओबीसींच्या गरीब लोकांवर एकप्रकारे अन्याय होईल असे काही लोकांचे मत आहे. हे एकदमच दुर्लक्ष करण्यासारखे नाही. त्याला पर्याय म्हणून आज जी 50 टक्क्यांची अट आहे, त्यात आणखी 15 ते 16 टक्क्यांची वाढ करण्यात यावी. यासंदर्भातील दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारे करुन घेतली तर हे प्रश्न सुटतील असे मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा :