रायगड : ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान सोहळ्यात म्हसळा तालुक्यातील दोन श्रीसदस्यांचा मृत्यू | पुढारी

रायगड : 'महाराष्ट्र भूषण' प्रदान सोहळ्यात म्हसळा तालुक्यातील दोन श्रीसदस्यांचा मृत्यू

म्हसळा; पुढारी वृत्तेसेवा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या म्हसळा तालुक्यातील दोन श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. महेश नारायण गायकर (वय ४२) रा. मेंदडी, जयश्री जगन्नाथ पाटील (वय ५०) रा. वारळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खारघर येथे महाराष्ट्र सरकारने निरुपणाकर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्यासाठी त्यांचे लाखो श्रीसदस्य, अनुयायी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातून हजारो श्री सदस्यांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती. मेंदडी आणि वारळ या दोन गावातील देखील श्री सदस्य गेले होते. पुरस्कार सोहळ्यासाठी भर उन्हात श्री सदस्य बसलेले असल्याने अनेकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला होता. या उष्मघाताने मेंदडी गावातील श्रीसदस्य महेश गायकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे पाश्चात्य आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तसेच वारळ गावातील श्री सदस्या जयश्री पाटील यांनाही उष्मघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात्य मुलगा व मुलगी आहे.

जयश्री पाटील यांचा एकुलता एक मुलगा अजिंक्य जगन्नाथ पाटील यांचे लग्न येत्या रविवारी (दि.२३) आहे. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच जयश्री पाटील यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या घटनेने मेंदडी व वारळ गावांसह संपूर्ण म्हसळा तालुक्यातील श्री सदस्यांमधून व नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताने म्हसळा तालुक्यातील मेंदडी व वारळ या दोन गावातील श्री सदस्यांचे बळी गेले. ही अतिशय वेदनादायी घटना आहे. आम्ही पाटील व गायकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
– श्री. रमेश खोत, सरपंच, वारळ ग्रामपंचायत

हेही वाचा : 

Back to top button