रायगड : मोलकरणीचा सव्‍वा तीन लाखांच्‍या दागिन्‍यांवर डल्‍ला | पुढारी

रायगड : मोलकरणीचा सव्‍वा तीन लाखांच्‍या दागिन्‍यांवर डल्‍ला

पनवेल; पुढारी वृत्‍तसेवा : मोलकरणीने घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये समोर आली. या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 02 च्या पथकाने अवघ्या ४८ तासांमध्‍ये संशयित  आरोपी मोलकरणीला अटक केली. संकिता जाधव असे तिचे नाव आहे.   तिच्याकडून 3 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

संकिता ही कामोठे वसाहतीमधील रहिवासी आहे.ती कामोठे वसाहतीमध्ये मोलकरणीचे काम करते. घरकाम करताना तिने कामोठे सेक्टर 19 ,प्लॉट नंबर 81 सत्यम हाईट्स मधील एका घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यानंतर ती फरार झाली होती. या प्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली होती.

फिर्यादीच्या घराच्‍या नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्‍यामुळे फिर्यादी आणि त्याचे कुटूंब त्यांच्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी गेले होते. तेथेही घरकाम करण्यासाठी संकीता येत होती. फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेले असताना, कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन ती  पसार झाली होती. फिर्यादी कामावरून घरी आल्यानंतर त्‍यांना सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्यांनी कामोठे पोलिसांना याबाबत माहिती दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा 02 च्या पथकाने तपासणी सुरू केली. पोलिसांना मोलकरणीचा संशय आल्यने त्यांनी तिच्याकडे कसून चौकशी केली. दागिने चोरल्‍याचे तिने कबुल केले. पोलिसांनी तिच्याकडून 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

हेही वाचा :

Back to top button