रायगड: महाडमध्ये तीव्र पाणीटंचाई; संतप्त नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा | पुढारी

रायगड: महाडमध्ये तीव्र पाणीटंचाई; संतप्त नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा

महाड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे करंजखोल गावानजीक जलवाहिनी नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे महाड शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला. नगरपालिकेने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी पुणे येथील ठेकेदाराला काम दिले आहे. परंतु, गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले दुरूस्तीचे काम पूर्ण न करता संबंधित ठेकेदार पुणे येथे पळून गेल्याची माहिती नगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली. परिणामी शहरातील बहुतांश भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई तसेच पाणीबाणी निर्माण झाली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळेच हा प्रकार घडल्याने संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर आज (दि.२) सकाळी रिकामे हंडे वाजवत मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

या संदर्भात महाड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता साळवी तसे भोईर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जलवाहिनीचे काम करण्यासाठी पुणे येथील एका ठेकेदाराला काम दिले आहे. १ ऑक्टोबरला रात्रीपर्यंत काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल, असा विश्वास या ठेकेदाराने व्यक्त केला होता. मात्र, शनिवारी रात्री उशिरापर्यंत टाकीमध्ये पाणी न चढल्याने नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी संबंधित जागेवर जाऊन विचारपूस केली. मात्र संबंधित ठेकेदार काम अर्धवट सोडून पुणे येथे पळून गेल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून भेडसावणारी भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने तीन टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, तो अत्यल्प असल्याची तक्रार नागरिकांकडून केली. रविवारी सकाळी पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिका प्रशासनावर धाव घेऊन तेथे रिकामे हंडे, कळशा, घागरी यांचा नाद करुन प्रशासनाचा निषेध केला.
दरम्यान, अर्धवट सोडून गेलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने स्वत: वर घेतली आहे. अन्य यंत्रणांमार्फत दुरुस्ती करून सोमवारी दुपारपासून पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे भोईर यांनी सांगितले.

शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या कोथुले धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे वारंवार जलवाहिनी नादुरूस्त होत आहे. यामुळे काकरतळे, शिंदे, आव्हाड, काकरतळे मोहल्ला भीमनगर, बाजारपेठ, सरेकर आळी, काजळपुरा, चवदार तळे या भागामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button