

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी येथील तरूणाने नगर येथील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान, त्या तरूणाने नंतर लग्नास नकार दिल्याने नगर येथील पिडितेच्या फिर्यादीवरून तरूण व आई- वडिलांसह पाच जणांवर बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. या घटनेतील 21 वर्षीय पिडित तरूणीची मैत्रीण नगर येथील एमआयडिसी परिसरात राहते. तिने पिडित तरूणी व नारायण कोपनर यांची ओळख करून दिली. 9 जून 2021 रोजी पिडीत तरूणी मैत्रीणीच्या घरी असताना नारायण ज्ञानदेव कोपनर (रा. तमनर आखाडा, ता. राहुरी) तेथे आला. तो तिला म्हणाला, 'माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू हो म्हण नाहीतर जिवाचे बरेवाईट करून घेईल,' अशी भिती दाखवत विश्वास संपादन केला.
तिला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवले. दरम्यान, पिडित तरूणी गर्भवती राहिली असता नारायण याने दही व नारळ पाण्यातून काहीतरी पाजल्याने तिचा गर्भपात झाला. रूग्णालयात औषधोपचार करुन नारायण याने तिला मारहाण करून, 'तू कोणाला काही सांगितले तर जिवे मारील,' अशी धमकी दिली. पिडित तरूणी नारायण कोपनर याच्या घरी गेली, असता त्याची आई, वडील व भावांनी जातीय वाचक शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर पिडितेने राहुरी पोलिसात फिर्याद दिली. नारायण ज्ञानदेव कोपनर, रंजनाबाई ज्ञानदेव कोपनर, ज्ञानदेव कोपनर, विलास कोपनर व भावड्या चोरमले (सर्व रा. तमनर आखाडा, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध मारहाणीसह अॅट्रोसीटी गुन्हा दाखल झाला. तपास डि.वाय. एस.पी. संदीप मिटके करीत आहेत.