शिवरायांच्या अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नपूर्तीसाठी कटिबद्ध होऊया : ज्योतिरादित्य शिंदे | पुढारी

शिवरायांच्या अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नपूर्तीसाठी कटिबद्ध होऊया : ज्योतिरादित्य शिंदे

नाते (जि. रायगड) : इलियास ढोकले/श्रीकृष्ण बाळ

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळामध्ये अखंड हिंदुस्थानचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज केले. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रतिवर्षी किल्ले रायगडावर होणारी ही वारी आपल्या आयुष्याची कर्तव्यपूर्ती असल्याची विनम्र भावनाही त्‍यांनी यावेळी व्यक्त केली.

पुण्यतिथी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्‍थिती असलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा सर्वसमावेशक होती. शेतकरी, महिला, सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देण्याची भूमिका घेत त्यांना बरोबर घेऊन अखंड भारताच्या निर्मितेचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी कटीबद्ध होऊया”.

“छत्रपती शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक होते. त्यांनी केवळ राजगादी किंवा राजसत्ता स्थापन केली नाही तर बहुजन हिताय, बहुजन सुखाय स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्र धर्म ही संकल्पना त्यांनी हृदयात जपली होता.आगरी, कोळी, रामोशी, धनगर, मुस्लीम अशा जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला आणि तो तडीस नेला. पहिले आरमार छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले. त्यांच्या आरमाराचा अभ्यास आजही जगातील अनेक देशांची नौदले करत आहेत. ” असेही ते म्‍हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन विकास साधण्याचे काम केले. त्यांच्या सकारात्मक विचारधारेची आज गरज आहे. महाराजांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प यावेळेस आपण सर्वांनी सोडू, यात आवाहनही ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.

किल्ले रायगडावरील राजसदरेवर आयोजित करण्यातया अभिवादन कार्यक्रमाला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास अभ्यासक डॉ . उदय कुलकर्णी, निवृत्त व्हॉईस ॲडमिरल मुरलीधर पवार, तानाजी मालुसरे यांचे वंशज, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, कार्यवाह सुधीर थोरात, सरकार्यवाह पांडूरंग बलकवडे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

भरतशेठ गोगावले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. किल्ले रायगडावर येणारी ही पंढरीची वारी असल्याचे नमूद करून ही एका परीने आपली कर्तव्यपूर्ती असल्याची भावना बोलून दाखविली. सर्व शिवभक्तांनी चालूवर्षी दाखवलेली मोठी संख्या पाहता त्यांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळातही किल्ले रायगडावर होणाऱ्या विविध कार्यक्रमांतून तसेच पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या कार्यक्रमाला शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्‍यांनी केले.

मंडळाचे अध्यक्ष श्री रघुजीराजे आंग्रे यांनी प्रास्ताविक कले. या वेळेस उदय कुलकर्णी यांना अकराव्या शिवस्मृती रायगड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर निवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार यांना सैन्यदल अधिकारी पुरस्काराने आणि समस्त तानाजी मालुसरे घराण्याला सरदार घराणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर राज्य सदरेपासून शिवसमाधीपर्यंत शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button