

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शहरात आठवड्यामध्ये 439 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आठवड्यात 3 जून रोजी सर्वाधिक 72 रुग्ण आढळले होते. सोमवारी (दि. 6) ही संख्या कमी झाली, परंतु रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी कोरोनासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व लक्षणे असल्यास तपासणी करून घ्यावी, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात सोमवारी 46 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 350 रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी 315 रुग्णांना किरकोळ लक्षणे असून, ते घरीच राहून उपचार घेत आहेत; तर 35 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, रुग्णालयांत दाखल कराव्या लागणार्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. दरम्यान, पुणे शहरातील रुग्णांच्या कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग (जनुकीय क्रमनिर्धारण) केले असता,
त्यापैकी 7 रुग्णांना बीए. 4 आणि बीए. 5 या दोन व्हेरिएंटची लागण झाल्याचे 30 मे रोजी आढळले होते. त्याचा संसर्ग होऊन ही रुग्णसंख्या वाढत असावी, असाही अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे, परंतु ती पुन्हा कमी झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, पण नागरिकांनी घाबरायचे कारण नाही. कारण त्याची लक्षणे अतिशय सौम्य असल्याचे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी
डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यातील दैनंदिन आकडेवारी
दिनांक नवीन रुग्णांची संख्या
30 मे 24
31 मे 33
1 जून 68
2 जून 65
3 जून 72
4 जून 68
5 जून 63
6 जून 46
सध्या शहरात नव्याने आढळणार्या कोरोनाबाधितांमध्ये अतिशय सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. यापैकी एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही, तसेच एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासलेली नाही. सध्या प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे महापालिकेची कोरोना चाचणी केंद्र कार्यरत आहेत. गरज भासल्यास या केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल.
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
हेही वाचा