धुळे : भाडणे येथील साखर कारखाना भाडेपट्ट्याने देताना नियमांचे उल्लंघन होऊ देऊ नका: आ.गावित | पुढारी

धुळे : भाडणे येथील साखर कारखाना भाडेपट्ट्याने देताना नियमांचे उल्लंघन होऊ देऊ नका: आ.गावित

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील भाडणे येथील पांझरा कान सहकारी साखर कारखाना शासनाच्या नियमानुसार भाडेपट्याने देत असतांना अटी शर्ती व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कारखाना बाबतच्या प्रक्रियेची वेळोवेळी आपणांस माहिती देऊन अवगत करावे याबाबतीचे निवेदन आ. मंजुळा गावित यांनी एम.एस.सी.बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांना नाशिक येथे दिले आहे.

सदरच्या थकबाकी बँकेच्या वसुलीसाठी सरकारच्या धोरणाप्रमाणे कारखाना विक्री करण्यास बंदी आहे. मात्र, भाडेपट्ट्याने कारखाना चालवायला देऊन बँकेची वसुली करण्यास मुभा आहे. बँकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात कारखाना भाडेपट्टयाने देण्याची निविदा काढून पवन मोरे नामक व्यक्तीच्या स्पर्श शुगर कंपनीला पांझरा कान कारखाना भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्याबाबतचे केवळ इरादापत्र दिले आहे. सदर भाडेपट्टे धारकाने निविदा मधील अटी शर्तीनुसार बँकेशी करार करणे आवश्यक आहे. परंतु सदर कंपनीने गेल्या चार महिन्यात वेळोवेळी मुदतवाढ मागून चालढकल केली आहे. कंपनीला बँकेतर्फे ३० मे पर्यंत मुदत वाढ दिली होती. परंतु, अजूनही आणखी आठ दिवस मुदतवाढ दिल्याने वसुलीबाबत अनाकलनीय माहती समोर येत आहे .सदर कंपनीने मधल्या काळात अनधिकृतपणे, बेकायदेशीररीत्या पांझरा कान कारखान्याची मालमत्ता कारखान्याच्या नावाचा उल्लेख न करता, भंगारमध्ये विक्री करण्याचा खटाटोप केला होता. कारखान्याचे साहित्य भंगारमध्ये विक्री केल्यानंतर बँकेने सदरच्या व्यक्तीवर कुठलीही कारवाई केलेली नाही. साक्रीला कारखान्यासंदर्भात नुकताच एक मेळावा घेण्यात आला होता. त्यात पवन मोरे यांच्या कंपनीला महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार कारखाना चालवायला देण्यास हरकत नाही असे ठरलेले आहे. बँकेने त्यांना पाठीशी घालू नये असा ठराव मेळाव्यात झालेला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button