

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी आवारात बेकायदा बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावलेल्या नोटिशीची मुदत संपली आहे. त्यामुळे आता हे अनधिकृत बांधकाम कधीही पाडले जाऊ शकते. शिक्षण क्षेत्रात नाव असलेल्या सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी आवारात बेकायदा बांधकाम करून हॉटेल थाटण्यात आले होते. हे बांधकाम नियमबाह्य असल्याने 'ते का पाडण्यात येऊ नये?' अशी नोटीसही पालिकेने बजावली होती. नोटीसची मुदत संपण्याआधी सोसायटीऐवजी हॉटेलचालकाने चार ओळीचे पत्र देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
सोसायटीने केलेली 'खेळी' उधळून लावत पालिका उपअभियंत्यांनी थेट कारवाई करण्याचा इशारा दिल्याने आता कधीही बुलडोझर फिरू शकतो. सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या आवारात थाटलेले 'हॉटेल अमेय' बेकायदा असल्याने महापालिकेच्या विभागाने ते पाडण्यात का येऊ नये? अशी नोटीस बजावली होती. त्याची मुदत 22 जून रोजी संपली असून, त्या बेकायदा इमारतीबाबत संस्थेने खुलासा करण्याऐवजी हॉटेलचालक संदीप शेट्टी यांच्यामार्फत महापालिकेच्या उपअभियंत्याकडे बाजू मांडली आहे.
प्रत्यक्षात सोसायटीच्या वतीने पालिकेच्या त्या नोटीसला उत्तर देणे गरजेचे होते. तसे न करता हॉटेलमालकामार्फत चार ओळींचा खुलासा देऊन त्या इमारतीत पॅन्ट्री असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या बांधकामाची परवानगी घेताना तसे काहीच नमूद नसल्याचे समजते. या बेकायदा बांधकामासंदर्भात अनेकदा तक्रार करूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे सोसायटीच्या वार्षिक बैठकीपूर्वी काही सूज्ञ नागरिकांनी पोलिसांसह पालिकेकडे याबाबत तक्रार केल्यानंतर ही नोटीस बजाविण्यात आली होती. योग्य वेळ देऊनही सोसायटीच्या वतीने समाधानकारक खुलासा न आल्याने ते नियमबाह्य बांधकाम पाडण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू झाल्या आहेत.
'एफडीए'चा परवाना नाही…
संस्थेच्या आवारात चालणार्या या हॉटेलला अन्न व औषधी प्रशासन विभागाचा परवाना नसल्याचे समजते. असे असले तरी नावाजलेल्या संस्थेच्या आवारात हे हॉटेल सुरू आहे. याशिवाय हॉटेलला जीएसटी क्रमांक नसतानाही बिलावर बनावट क्रमांक टाकून ग्राहकांकडून तो वसूल केला जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
मला यावर काहीच भाष्य करायचे नाही…
या प्रकरणात सोसायटीची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असता सचिव मिलिंद देशमुख यांनी मला यावर काहीच भाष्य करायचे नाही, असे सांगितले. मित्र या नात्याने तुमचा कॉल रिसिव्ह केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेकडे आलेल्या तक्रारीनुसार सोसायटी आवारात नियमबाह्य बांधकाम व तेथे चालणारे हॉटेल पाडण्यात का येऊ नये? अशी नोटीस बजावली होती. त्या नोटिशीची मुदत संपली असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने लवकरच कारवाई करण्यात येईल.
– सुनील कदम, उपअभियंता, मनपा, झोन 6
हेही वाचा