

नायगाव, पुढारी वृत्तसेवा: जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली. यंदा हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जोरदार पाऊस होईल व मशागतीला वेग येईल या आशेने शेतकरी सुखावला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी पूर्व भागातील शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरत असले तरी इतरत्र पावसाशिवाय मशागतीच्या कामांना वेग मिळत नाही. जूनच्या पहिल्याच आठवड्यात वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने मशागतीला लागणार्या अवजारे, बियाणे याची तजवीज बळीराजा करतो न करतो तोच पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांचा हिरमोड झाला. पावसाने हजेरी लावलेल्या भागातील शेतकर्यांनी बियाण्याची खरेदी, अवजारांची दुरुस्ती, बांधणी करून ठेवली आहे.
काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे वाफसा झाल्यानंतर अनेकांनी पेरणी देखील केली. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बियाणांच्या उगवणीसाठी पावसाचा थेंबही पडला नाही अशा ठिकाणचे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षात शेतकर्यांना म्हणावे असे उत्पन्न मिळालेले नाही. यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यास शेतकर्यांचे जीवन कठीण होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा