वैष्णवांचा मेळा पुण्यात मुक्कामी वसला

वैष्णवांचा मेळा पुण्यात मुक्कामी वसला
Published on
Updated on

पुणे,पुढारी वृत्तसेवा: टाळ-मृदंगाच्या तालावर… हाती भगव्या पताका… सोबतीला मृदूंगाची स्थान अन ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत, वैष्णवांचा मेळा बुधवारी रात्री उशीरा पुण्यात वसला. दरम्यान, प्रसिध्द असलेला लक्ष्मी रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता भाविकांच्या आणि वारकर्‍यांच्या गर्दीने गजबजला होता.

भक्तिने भरलेल्या वातावरणात आनंदाने तल्लीन झालेले पालखी सोहळ्यातील वारकरी जसजसे फर्ग्युसन रस्त्याने आणि लक्ष्मी रस्त्याने जात होते. तसतशी पुणेकर भाविकांची पालख्यांच्या दर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचत होती. संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी 5 वाजून 36 मिनिटांनी तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 7 वाजून 14 मिनिटांनी वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट चौकात पोहोचली. यावेळी येथे जणूकाही भक्तीचा सागरच उसळला.

वाकडेवाडी पुलासह संपूर्ण पालखी मार्गावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळांतर्फे तसेच सर्वधर्मिय नागरिकांच्या वतीने येथे वारकर्‍यांना औषधे, पिण्याचे पाणी आणि खाद्य पदार्थांच्या पाकिटांचे बुधवारी वाटप करण्यात आले. दोन्ही पालख्या सायंकाळच्या 8 च्या सुमारास फर्ग्युसन रस्त्यावर पोहोचल्या. त्यांची आरती झाल्यानंतर त्या तेथून पुढे मुक्कामाच्या दिशेने निघाल्या. फर्ग्युसन रस्त्यावर तुकाराम महाराजांच्या मंदिरात आरती झाली.

तर याच रस्त्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात आरती झाली. त्यानंतर पालखी सोहळा लक्ष्मी रस्त्याने पुण्यात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचला. रात्री 9.30 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी निवडूंगा विठोबा मंदिरात मुक्कामाला पोहोचली. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेत रात्री 10 वाजता पालखी विठोबा मंदिरात पोहोचली. यावेळी मंदिराच्या पदाधिकार्‍यांनी आरती करून पादूकांचे पूजन केले. दहिभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा दर्शनबार्‍या सुरू झाल्या. पालखी पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे.

मार्गावर आकर्षक रांगोळी आनि फुगड्यांचे फेर
पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी, अभंग, फुगडीसारखे खेळ आणि अखंड हरिनामाचा गजर सुरू होता. टिळक चौक, फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह ठिकठिकाणी पुणेकरांनी रांगोळ्या काढल्या होत्या. अशा भावपूर्ण वातावरणाने आसमंत दुमदुमून गेला होता. शहरात जाणारे रस्ते भाविकांच्या दुतर्फा गर्दीने फुलून गेले होते.

पालखी दर्शनाकरीता रस्त्याच्या दुतर्फा रांगा
पालखी दर्शनाकरीता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. माऊली व तुकोबांच्या पालखी समोरून डौलाने चालणार्‍या अश्वांचेही दर्शन नागरिक मोठ्या भक्तीभावाने घेत होते. संचेती पुलावरून पालखी पुढे गेल्यावर पालखीची जागोजागी आरती करण्यात आली.

पालखी सोहळ्याचा वृत्तवाहिन्यांना विसर
राज्यातील राजकीय घडामोडीचे दिवसभर वार्तांकन करण्यात गुंग झालेल्या वृत्तवाहिन्यांना राज्यातील सर्वात मोठ्या पालखी सोहळ्याचा विसर पडल्याचे बुधवारी दिसून आले. दोन वर्षानंतर यंदा भरलेल्या पालखी सोहळ्याला राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या उत्साहाने हजारो वारकरी आले आहेत. दोन्ही पालख्या आज पुण्यात पोहोचल्या. मात्र, या आनंदोत्सवाचे वार्तांकन वृत्तवाहिनींनी केलेच नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news