

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला समोर बसून चर्चा करण्याचा प्रस्ताव धुडकावला असून, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे या भूमिकेवर ते ठाम आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधल्यानंतर सायंकाळी शिंदे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र तो बेत नंतर रद्द झाला. त्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास शिंदे यांनी दोन ट्विट करून मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुखांना उत्तर दिले.
गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.
घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे-शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, असे शिंदे पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात.
पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी या अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी दुसर्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिंदे सरकारमधून बाहेर पडण्यावर ठाम असल्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात यावर या बंडखोरीचे फलित अवलंबून असेल. मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर तसे मला फोन करून सांगा, असे उद्धव यांनी बंडखोरांना उद्देशून म्हटले होते. परंतु या दोन्ही ट्विटमध्ये शिंदे यांनी तशी कोणतीही मागणी केलेली नाही. मात्र, दोन्ही काँग्रेससोबतच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असे शिंदे यांनी पुन्हा सांगून एक प्रकारे उद्धव यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचाच सल्ला दिला आहे.
"काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या मंडळींनी जर मी मुख्यमंत्री म्हणून नको सांगितलं असतं तर मी समजून घेतलं असतं. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं. माझ्या सहकाऱ्यांनी सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ तोंडावर सांगावं, मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. राजीनाम्याचं पत्रही तयार करुन ठेवतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी इथे परत यावं आणि माझं पत्र घेऊन राज्यपालांना द्यावं. ही लाचारी किंवा मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारायला तयार आहे. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला नक्कीच त्याचा आनंद आहे.", असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे.