विदेशी माशांच्या आक्रमणामुळे स्थानिक 56 प्रजाती नामशेष; मुळा-मुठेतील मत्स्यजीवन होतेय र्‍हास

विदेशी माशांच्या आक्रमणामुळे स्थानिक 56 प्रजाती नामशेष; मुळा-मुठेतील मत्स्यजीवन होतेय र्‍हास
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी : प्रचंड प्रदूषण आणि चिलापीसारख्या विदेशी माशांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मुळा-मुठा नद्यांतील तब्बल 56 स्थानिक माशांच्या प्रजाती नामशेष झाल्या असून पवना नदीत घातक मांगूर प्रजातींची संख्या प्रचंड वाढल्याचे धक्कादायक चित्र आहे.
मुळा-मुठेतील मत्स्यजीवन होतेय र्‍हास; पवनेत घातक मांगूर वाढले ब्रिटिश संशोधक फ्रेजर यांनी 1846 मध्ये या नद्यांचा अभ्यास करून संशोधनपत्र केले आहे.

त्या काळात या नद्यांमध्ये माशांच्या 56 स्थानिक प्रजाती होत्या. हे मासे शहरात कुठे विक्री केले जात होते, याचीही नोंद पत्रामध्ये आहे. खडकवासला आणि पाणशेत धरणांमुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला. नदीकाठी लोकवस्ती वाढत गेली आणि नदीचा जीव गुदमरून माशांच्या सर्व प्रजाती नामशेष झाल्याचे निरीक्षण नदी अभ्यासकांनी नोंदविले आहे.

विदेशी माशांनी केले गिळंकृत

चिलापी या मूळच्या आफ्रिकन माशाची जात मात्र चीनमधून आपल्याकडे आलेल्या या माशांमुळे स्थानिक मासे नामशेष झाले आहे. नदीतील मत्स्यजीवनाचे अभ्यासक डॉ. संजय खरात यांनी सांगितले की, नदीपात्रात कपडे – जनावरे धुणे, निर्माल्य, प्लास्टिक सांडपाण्याचा प्रवाह यामुळे नदीपात्र प्रदूषित झाले आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहात प्लास्टिक, घाण साचून बेटे तयार झाली आहेत. वर्षानुवर्षे साचणारा सेंद्रिय कचरा कुजून मिथेन गॅसचे प्रमाण वाढून पाण्यातून बुडबुडे येत आहेत.

कचरा कुजविण्यासाठी पाण्यातील ऑक्सिजनचा वापर होत असल्याने साहजिकच ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन याचा परिणाम जलचरांवर झाला आहे. अतिशय गढूळ आणि प्रदूषित पाण्यात तग धरणारे आक्रमक चिलापीसारखे मासे स्थानिक माशांचा पाठलाग करून त्यांना नष्ट करतात तसेच त्यांची अंडी खातात. त्यामुळे या माशांनी स्थानिक सर्व मासे संपुष्टात आणले. आता मुळा-मुठेमध्ये चिलापीसारख्या माशांचेच अस्तित्व उरले आहे.

दुर्मीळ मासेही संपले

पाऊस पडल्यावर प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रजनन करणारे दुर्मीळ मासे संपल्यात जमा आहेत. झोर्‍या, दांडवण, फेक, घोगार्‍या, पथ्थरचाटू, मळे, खवल्या, अमळ्या, लोळी यांसारख्या माशांच्या प्रजाती आता नदीपात्रात दिसत नाहीत. अत्यंत चवदार शिवडा, लालपरी, रोहती वाटाणी, मुरे आणि त्याच्या इतर प्रजातीही आता गायब झालेल्या आहेत.

पवनेत मांगूरचा सुळसुळाट

केंद्रीय हरित लवादाने बंदी घातलेल्या घातक मांगूर माशांची संख्या पवना नदीत वाढली आहे. विशेष म्हणजे 15 किलोहून अधिक वजनाचे मांगूर मासे नदीपात्रात दिसत असल्याची नोंद वर्ल्ड फॉर नेचर जलजीवन संरक्षण संस्थेने केली आहे. मांगूर मासा हा मांसभक्षक असल्याने पर्यावरण व आरोग्याला घातक आहे.

त्यामुळे या माशाचे उत्पादन, वाहतूक आणि विक्रीवर केंद्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. याबद्दल सांगताना संस्थेचे अध्यक्ष गिरीश पालखे म्हणाले, पवना नदीतील महाशीर, रोहू, मिरगन, कानोशी, लालपरी, कटला आदी माशांच्या प्रजाती नामशेष झाल्या आहेत. सध्या मांगूर आणि चिलापी या अस्वच्छ पाण्यामध्ये राहणार्‍या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आहेत.

वाढत्या नागरीकरणामुळे पुणे, पिंपरी, चिंचवडमधील नद्यांमध्ये माणसाचा हस्तक्षेप वाढला आहे. 20 वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत मुळा-मुठा नदीपात्रात माशांच्या 40 प्रजाती दिसून आल्या होत्या. त्यामध्ये चिलापी, मांगूर, गप्पीसारख्या 14 प्रजाती विदेशातील होत्या. आता स्थानिक एकही प्रजात उरलेली नाही. विदेशी माशांचे आक्रमण आणि प्रचंड प्रदूषणामुळे नदीतील मत्स्यजीवन उद्ध्वस्त झाले आहे.

                                      – डॉ. संजय खरात, मत्स्य अभ्यासक

https://youtu.be/TFJzcj3fdeY

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news