चार कोटीचे रक्तचंदन जप्त; एकास अटक: एमआयडीसी पोलिसांची कारवाई

नगर ः खाली बसलेला आरोपी आणि जप्त केलेल्या रक्तचंदनासह पोलीस अधिकारी व पथकातील कर्मचारी.
नगर ः खाली बसलेला आरोपी आणि जप्त केलेल्या रक्तचंदनासह पोलीस अधिकारी व पथकातील कर्मचारी.

नगर : पुढारी वृत्तसेवा

एमआयडीसीतील गोदामात बटाट्याच्या गोण्याखाली दडून ठेवलेले 3 कोटी 83 लाखाचे साडेसात टन रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. चोरीचे हे रक्तचंदन गोदामात ठेवले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदाशिव सीताराम झावरे (रा.दूधडेअरी चौक,एमआयडीसी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

झावरे याचे एमआयडीसी परिसरात गोदाम असून त्यात रक्तचंदन लपविल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना मिळाली होती. पथकासह त्यांनी गोदामावर छापा टाकला असता बटाट्याच्या गोण्याखाली लपविलेले रक्तचंदन आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 3 तीन कोटी 83 लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गोदामाशेजारी असलेल्या नाल्याची दुर्गंधी आणि रक्तचंदनच्यावर बटाट्याच्या गोण्या असल्याने पोलिसांना रक्तचंदनाचा शोध घेण्यात वेळ लागला. मात्र जेव्हा बटाट्याच्या गोण्या काढण्यात आल्या तेव्हा रक्तचंदन आढळून आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदाशिव सिताराम झावरे व त्याच्या तीन फरार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झावरे विरोधात एमआयडीसी व तोफखाना पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. रक्तचंदन कर्नाटक राज्यात भेटत असल्याने त्यादृष्टीने पोलीस तपास करणार आहेत. रक्तचंदन कुठून आले?, कुठे जाणार होते हे तपासात समोर येईल, असे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

आंतरराज्यीय टोळीचा संशय

एमआयडीसी पोलिसांच्या छाप्यात मिळालेल्या रक्तचंदनाचा कॉस्मॅटीक्ससाठी उपयोग होत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रक्तचंदनाचे मार्केट नगर मध्ये नसले तरी या रक्तचंदन साठ्यामागे आंतरराज्यीय टोळी असल्याचा संशय देखील पोलिसांना आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news