पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर होत असलेल्या दोन्ही पालखी सोहळ्यांनिमित्त वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. पुणे महापालिकेतर्फे वारकर्यांसाठी मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी ही माहिती दिली.
वारकर्यांना तिन्हीपैकी कुठलाही डोस वारीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग वारकर्यांसाठी विविध आरोग्याच्या सुविधा पुरविणार आहे. डॉ. देवकर म्हणाले, 'पालखी मुक्काम ठिकाणी आणि मार्गावर वैद्यकीय पथकांसह लसीकरण केंद्रे उभारली आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाजवळ किडवाई शाळेत लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. येथे चोवीस तास लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाजवळ असलेल्या बडदे दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी वारकर्यांसाठी दिवस-रात्र लसीकरण होणार आहे.
त्यासाठी डॉक्टर, परिचारिका असे वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. पालखी मार्गावर दिवसभर वारकर्यांसाठी मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सौम्य प्रमाणात वाढत आहे. पालखीमध्ये गर्दी होते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे.'
हेही वाचा