चोरीच, पण ट्रॅक्टरची.. चोर शिताफीने जेरबंद! | पुढारी

चोरीच, पण ट्रॅक्टरची.. चोर शिताफीने जेरबंद!

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  केवळ दुचाकीच नव्हे तर कार, रिक्षा चोरीस गेल्याचे ऐकिवात आहे, पण चक्क ट्रॅक्टरची चोरी झाल्याने कोपरगाव तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन लाख रुपयांच्या या ट्रॅक्टरसह पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, 7 जूनच्या रात्री तालुक्यातील कोळपेवाडी येथून दोन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर (क्र. एम.एच.17 ऐ. व्ही. 4216) चोरीस गेल्याची फिर्याद शाकीर हमीद सय्यद (वय 60, कोळपेवाडी) यांनी दिली होती. या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नको असलेल्या व्यक्‍तीपासून लपवू शकता प्रोफाईल फोटो

तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरविली. गोपनीय बातमीदारामार्फत चोरट्याची माहिती घेवून तपास सुरु केला. ट्रॅक्टर चोरून नेणारा दीपक चंद्रभान मोरे (वय 32, रा. कोळगाव थडी, ता. कोपरगाव) यास पोलिसांनी 17 जून रोजी रात्री 2 वाजता सापळा रचुन शिताफिने जेरबंद केले.

दीपक मोरे याने चोरुन नेलेला ट्रॅक्टर धारणगावच्या पडीत काटवणातून हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक, स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पो. नि. दौलत जाधव, पो. ना. विलास कोकाटे, पो.काँ. अविनाश तमनर, पो. काँ. नवनाथ गुंजाळ व किसन सानप यांनी यशस्वी केली.

Back to top button