पालखी सोहळ्यानिमित्त मंदिरांमध्ये जय्यत तयारी | पुढारी

पालखी सोहळ्यानिमित्त मंदिरांमध्ये जय्यत तयारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: उत्सव मंडप उभारणीत व्यग्र असलेले कर्मचारी, मंदिराच्या गाभार्‍यात विद्युतरोषणाईच्या कामाला सुरुवात, मंदिराची अन् मंदिर परिसरातील रंगरंगोटी, साफसफाई अन् सजावटीच्या कामात व्यग्र असलेले सेवेकरी, असे वातावरण श्री पालखी विठोबा मंदिर (भवानी पेठ) आणि श्री निवडुंगा विठोबा मंदिरात (नाना पेठ) पाहायला मिळत आहे.

दोन्ही मंदिरांमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त जय्यत तयारी करण्यात येत असून, विद्युतरोषणाईने मंदिरे उजळली आहेत. विश्वस्तांपासून ते सेवेकरीपर्यंत सगळ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात असतो.

कोरोनामुळे दोन वर्षे पालखी सोहळा न झाल्याने लोकांमध्ये एक रुखरुख होती. पण, यंदा दोन्ही मंदिरांतील प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. श्री पालखी विठोबा मंदिरात (भवानी पेठ) 22 आणि 23 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचाही मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहे. दोन्ही पालख्यांमधील दिंडीतील वारकर्‍यांच्या मुक्कामासाठी मंदिरांकडून खास तयारीही करण्यात आली आहे.

गोवा : मुख्यमंत्र्यांचे बनावट व्हॉटस्अ‍ॅप खाते बनविणार्‍याला अटक

दि. 24 जूनला दोन्ही पालख्या पहाटे प्रस्थान करणार आहेत. याविषयी श्री निवडुंग्या विठोबा मंदिराचे (नाना पेठ) व्यवस्थापक आनंद पाध्ये म्हणाले, ‘यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्यासाठी विशेष तयारी सुरू आहे आणि ती अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराबाहेर महापालिकेकडून उत्सव मंडप उभारण्यात आला आहे आणि त्यात विद्युतरोषणाई करण्यात येत आहे.’

मंदिराच्या साफसफाईसह मंदिरातील चांदीच्या कमानींचे पॉलिश करण्यात आले आहे. दिंडीतील वारकर्‍यांचा विसावा मंदिरातील सभागृहात असतो. त्याचीही साफसफाई करण्यात आली आहे. जवळपास तीन हजार वारकरी मुक्कामाला असणार आहेत. त्यांच्यासाठी दुपारचे आणि रात्रीच्या जेवणाची सोय करणार आहोत. यंदा संपूर्ण मंदिरात फुलांची आणि विद्युतरोषणाईची सजावट करणार असल्याचेही पाध्ये यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पालखी सोहळ्यासाठी मंदिराची रंगरंगोटी, साफसफाई, उत्सव मंडपाची उभारणी आणि सजावटीचे काम अंतिम टप्पात आहे. वारकर्‍यांच्या मुक्कामाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात गर्दी वाढणार असल्याने त्याचेही नियोजन केले आहे. वारकर्‍यांच्या मुक्कामासाठी यंदा पालिकेने कमी मंडप उभारले आहेत. त्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

– तेजेंद्र कोंढरे, अध्यक्ष, श्री पालखी विठ्ठल मंदिर ट्रस्ट, भवानी पेठ

हेही वाचा

नगर : बळीराजाला पावसाची चातकासारखी आस

रेल्वेस्थानकावर बंदोबस्तात वाढ; ‘अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनाचे पडसाद

‘अग्निपथ’ प्रकरण : सोशल मीडिया पोलिसांच्या रडारवर

Back to top button