पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश याच्या मोटारीत धमकीवजा मजकूर असलेली चिठ्ठी सापडली. मोरे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसांपूर्वी वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश आणि सहकार्यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
त्यावेळी त्यांनी कात्रज भागातील शाळेजवळ मोटार लावली होती. त्या वेळी मोटारीच्या वायपरला चिठ्ठी अडकवून ठेवल्याचे रूपेश यांच्या लक्षात आले. रूपेश जपून रहा, असा धमकीवजा मजकूर या गाडीवर अडकवलेल्या चिठ्ठीत लिहिण्यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून किंवा खोडसाळपणे चिठ्ठी लिहिण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोरे यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांकडून याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तपास करीत आहेत.
हेही वाचा