रेल्वे अधिकारी थेट प्लॅटफॉर्मवर; नेमकं कारण काय?

रेल्वे अधिकारी थेट प्लॅटफॉर्मवर; नेमकं कारण काय?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावरील वाढत्या गर्दीमुळे एसीमध्ये बसून पुणे विभागाचा कारभार पाहणार्‍या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना अखेर प्लॅटफॉर्मवर उतरावे लागले. त्यामुळे अनेक असुविधांना सामोरे जाणार्‍या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. उन्हाळी सुट्यांमुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासोबतच गाड्यांमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

अनेकदा रेल्वे कर्मचारी प्रवाशांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष करतात, या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना प्लॅटफॉर्मवर आणि गाड्यांमध्ये उतरवण्यात आले. रेल्वे मुख्यालयातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, सहायक वाणिज्य व्यवस्थापक शीलभद्र गौतम, अजय कुमार यांच्यासह विविध विभागातील रेल्वे अधिकार्‍यांकडून रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी नियंत्रण आणि प्रवाशांच्या सोईसाठी काम केले जात आहे.

अतिरिक्त आरपीएफ कर्मचारी तैनात

रेल्वे स्थानकावरील गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वेच्या प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत अतिरिक्त आरपीएफ अधिकारी, कर्मचारी पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर तैनात करण्यात आले आहेत. या वेळी गर्दी नियंत्रण आणि गर्दीचा फायदा घेत होणार्‍या चोर्‍या रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

इतर ब्रॅंडच्या पाण्याच्या बाटल्या जप्त

रेल्वे अधिकार्‍यांनी तपासणी करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना स्थानकावर अनेक चुकीच्या घटना घडत असल्याचे दिसले. स्थानकावर रेलनीरलाच परवानगी असताना देखील इतर ब्रॅंडच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री सुरू होती. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सहायक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी तत्काळ कारवाई करत ती थांबविली. इतर ब्रॅंडच्या बाटल्या जप्त केल्या.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news