वाल्हे : पुढारी वृत्तसेवा
जून महिना हा पावसाची सुरुवात करणारा महिना समजला जातो. मात्र, पाऊस पडण्याऐवजी उन्हाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. परिणामी, हिरव्या चाऱ्याचा भाव गगनाला भिडला आहे. जून महिन्याला सुरुवात झाली असली, तरी वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात अजूनपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस एकदाच एप्रिल महिन्यात थोडा पडला होता.
मात्र, दररोजच्या वाढत्या उष्णतेने जमिनीतील जलस्रोत आटत चालले असून, पाणीटंचाई निर्माण होत असल्याने जनावरांच्या हिरव्या चार्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकर्यांनी गाई-म्हशी पाळल्या आहे. अनेक अडचणींवर मात करीत अनेकांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू केला होता.
मात्र, जनावरांच्या हिरव्या चार्यांच्या टंचाईमुळे व पशुखाद्यामध्ये होणार्या दरवाढीमुळे शेतकर्यांना हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला आहे. साखर कारखाने मागील महिन्यात बंद झाले. साखर कारखाने सुरू असताना ओला चारा म्हणून उसाचे वाडे दररोज ताजे उपलब्ध होत होते. मात्र, कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने पशुपालकांवर हिरव्या चार्याचे संकट उभे राहिले आहे.
गायी, म्हशी पाळून दुधाचा व्यवसाय करणारे अनेक शेतकरी आता उसाच्या, तसेच इतर पिकांमधील शेतातील गवत काढून जनावरांना टाकून दिवस पुढे ढकलत आहेत. मात्र, याचा मोठ्या प्रमाणात दुभत्या जनावरांना फटका बसत असून, दुधाच्या उत्पादनात मोठी घट होत आहे.
मागील वर्षी वाल्हे व परिसरात पाऊस कमी प्रमाणात झाला होता. या वर्षीचा उन्हाळा दर वर्षीपेक्षा तीव्र होता. परिणामी, अनेकांची विहीर, बोअरवेल यांच्या पाण्याची पातळी खोलवर गेली. दरम्यान, शेतकरीवर्गाला हिरवा चाराटंचाई जाणवत असून, वाढती उष्णता व हिरवा चाराटंचाईमुळे दूध उत्पादन घटले आहे.
नारायण पवार, दूध उत्पादक शेतकरी, सुकलवाडी.
हेही वाचा