आरटीओला दोन कोटी 80 लाखांचा महसूल | पुढारी

आरटीओला दोन कोटी 80 लाखांचा महसूल

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा : 
आरटीओला 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या एका वर्षात चॉईस नंबर (आवडता नंबर) मधून 2 कोटी 80 लाखांचा महसूल मिळाला आहे.

नवीन दुचाकी, चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर या वाहनांसाठी आरटीओकडून (उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) वाहनधारक हे आपल्या पसंतीचा अथवा लकी नंबर घेण्याकडे कल असतो. या माध्यमातून आरटीओला चांगलाच महसूल मिळतो. गेल्या आर्थिक वर्षात जवळपास 4 हजार वाहनचालकांनी चॉईस नंबर घेतला आहे. त्यामुळे आरटीओ चॉईस नंबरसाठी लकी ठरले आहे.

लकी नंबर, मोबाईल नंबरचे शेवटचे आकडे, आकड्यांची बेरीज, जन्मवर्ष, ज्योतिष अंकशास्त्रानुसार क्रमांक अशा विविध प्रकारच्या क्रमांकांना वाहनधारकांकडून मागणी असते.

यासाठी आरटीओने वाहनधारकांना वाहनांसाठी चॉईस क्रमांक घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सोलापूर विभागात दरवर्षी नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी वाढत आहे.

यातील बहुतांश वाहनधारक हे आपल्या वाहनांसाठी आपल्या पसंतीचा क्रमांक मिळावा यासाठी आरटीओकडे अर्ज करतात. आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणीची नवीन सिरीज सुरू होताच काही विशिष्ट क्रमांकासाठी संबंधित वाहनधारकांकडून आरटीओ कार्यालय ठरावीक रक्कम आकारते. त्याचबरोबर एकाच नंबरसाठी अनेक अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येतोे. सर्वाधिक रक्कम भरणार्‍यास त्या वाहनधारकास तो चॉईस नंबर देण्यात येतो. मागील वर्षात आरटीओला या चॉईस नंबरवरुन 2 कोटी 80 लाखांचा महसूल मिळाला आहे.चॉईस नंबर घेण्याकडे वाहनधारकांचा कल वाढला आहे. यामध्ये नेतेमंडळी, कार्यकर्ते, उद्योगपतींचा अधिकतर समावेश आहे.

Back to top button