मुदतवाढ मिळाली; मात्र दंडाचा भुर्दंड | पुढारी

मुदतवाढ मिळाली; मात्र दंडाचा भुर्दंड

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा : 
केंद्रीय कर मंडळामार्फत पॅन-आधारकार्ड जोडणीसाठी दिलेली मुदत 31 मार्च रोजी संपल्याने अनेकांना विविध व्यवहारांत अडचणी येत आहेत. आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी दंडाचा भुर्दंड बसणार आहे.

आधारकार्ड आणि पॅनकार्ड यांची जोडणी नसलेल्यांना 30 जून 2022 पर्यंत आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक केल्यास 500 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. 30 जूननंतर जोडणी केल्यास 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

दैनंदिन बँकिंग व्यवहार, शिक्षण, खरेदी, डीमॅटप्रमाणे अनेक घटकांसाठी पॅनकार्ड, आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. केंद्रीय कर मंडळाने त्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. काही कारणांनी ही जोडणी करू न शकलेल्या कित्येकांना त्याची झळ सोसावी लागत होती. ही जोडणी न करू शकणार्‍यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, डिजिटल व्यवहाराचे ज्ञान नसलेल्यांसह रोजंदारीवर काम करणार्‍या घटकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे काही कारणाने पॅन आणि आधारकार्ड जोडणीत झालेल्या चुकीच्या नोंदीमुळेही काहींची जोडणी पूर्ण झालेली नाही.

पॅन-आधारकार्डामधील नोंदीत अक्षर, आकड्यांच्या चुकीनेही अनेकांची जोडणी झालेली नाही. काही कारणांनी जोडणी न केलेल्या अनेकांना प्रत्यक्ष व्यवहारात अडचणी जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे पॅन-आधारकार्ड जोडणीसाठी मुदतवाढीची मागणी केली होती.
पॅन-आधारकार्ड जोडणी न करू शकलेल्यांना 1 जूनपासून आधारकार्ड-पॅनकार्ड जोडणीची सुविधा आयकर विभागाच्या वेबसाईटवर सुरू करण्यात आली आहे.

Back to top button