बावडा, पुढारी वृत्तसेवा: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील देवाच्या स्वारीच्या अश्वाचे बावडा (ता. इंदापूर) येथे सालाबादप्रमाणे रविवारी (दि. 12) स्वागत करण्यात आले. अश्व हा देहूला सोमवारी (दि. 20) सकाळी 7 वाजता पोहचणार आहे. पेठ बाभूळगाव (ता. पाथरी, जि. परभणी) येथील विनायक नारायण रणेर यांच्या मालकीचा अश्व असून, त्यांची ही चौथी पिढी आहे.
परभणी जिल्ह्यातून हा अश्व पंढरपूरला चालत दाखल झाल्यानंतर तेथून तो दि. 11 जून रोजी माही दिंडीबरोबर देहूकडे तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी निघालेला आहे. ह.भ.प. निवृत्ती महाराज चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली पायी चाललेल्या या दिंडीमध्ये सुमारे 50 वारकरी आहेत. ह.भ.प. नामदेव निवृत्ती गिराम हे सध्या तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार आहेत.
दरम्यान, बावडा येथे दिंडी सोहळा आल्यानंतर घाडगे कुटुंबीयांनी अश्वाचे पूजन केले. तसेच, जयवंत घाडगे यांनी नामदेव महाराज चोपदार यांचा सत्कार केला व वारकर्यांचे अल्पोपाहार देऊन स्वागत केले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा दोन वर्षांनंतर पंढरपूरकडे प्रस्थान करीत असल्याने वारकर्यांच्या उत्साहाला पारावार राहिलेला नाही. त्यामुळे चालू वर्षी पालखी सोहळ्यामध्ये वारकर्यांची गर्दी अधिक असेल, असे निवृत्ती महाराज चोपदार यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले.
हेही वाचा