विधान परिषद निकालानंतर समीकरणे बदलण्याची शक्यता

विधान परिषद
विधान परिषद
Published on
Updated on

राज्यसभा निवडणूक निकालाचे धक्के राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला बसू लागले आहेत. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभा निकालाची पुनरावृत्ती झाल्यास राज्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीत भक्कम संख्याबळ असूनही महाविकास आघाडीच्या अर्थात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. आघाडीची मते फुटल्याशिवाय भाजपचे महाडिक निवडून आले नसते आणि आघाडीतूनच छुपी रसद मिळाल्याखेरीज हा चमत्कार घडला नसता. यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनीतीचा आणि कल्पक डावपेचाचा आणि पद्धतशीर व्यूहरचनेचा जसा भाग आहे, तसाच आघाडीतूनही पडद्याआड काही हालचाली झाल्या असाव्यात, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

राज्यसभेसाठी खुले मतदान होते, तर विधान परिषदेसाठी गुप्त मतदान होणार आहे. कोणी, कोणाला आणि कसे मतदान केले, हे समजायला वाव असणार नाही. त्यामुळेच फडणवीस यांनी मांडलेला 'सद्सद्विवेक बुद्धी'चा मुद्दा बराच सूचक आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आधीच अनेक मोहरे गळाला लावले असतील आणि विधान परिषद रणधुमाळीतही ऐनवेळी कोणी भाजपच्या छावणीत डेरेदाखल झाले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही, असेही तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत राज्यसभा निवडणुकीचीच पुनरावृत्ती झाली तर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार काय, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा संदर्भ आहेच. त्यामुळे विधान परिषदेत पुन्हा चमत्कार घडला तर राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार का, अशा चर्चेला वेग आला आहे.

आघाडीतील तणाव भाजपच्या पथ्यावर

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे पक्षाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी थेट काही अपक्ष आमदारांची नावे घेऊन त्यांनी आघाडीला मते दिली नाहीत, असा जाहीर आरोप केला. त्यातून आघाडीत संशयकल्लोळ झाला. या अपक्षांनी संजय राऊत यांचा आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची या अपक्षांनी भेट घेतली आणि आपण आघाडीशी निष्ठावान राहिल्याची खातरजमा करून दिली. त्यातच शिवसेनेच्या बैठकीत अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांतच खडाजंगी झाली.

या घडामोडी होत असतानाच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 'विधान परिषद निवडणुकीत आम्हाला गृहीत धरू नका,' असा इशारा दिल्याने आघाडीतील तणावात भरच पडली आहे. आघाडीतील हा तणाव भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या दहा जागांच्या लढतीत काय होणार, याविषयीची उत्सुकता वाढली आहेच; शिवाय त्याचे परिणाम काय होतील, याविषयीही चर्चेने वेग घेतला आहे.

  • सुरेश पवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news