

निरा : पुढारी वृत्तसेवा: श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा सोहळा शुक्रवारी (दि. 24) पुरंदरमध्ये येत आहे, तर संत सोपानकाका व संत चांगावटेश्वर पालख्यांचे प्रस्थान शनिवारी (दि. 25) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुरंदरच्या प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती पुरंदर-हवेलीचे आ. संजय जगताप यांनी दिली. भेकराईनगर ते निरापर्यंतच्या पालखी मार्गावरील पालखी विसावा व मुक्कामाच्या ठिकाणच्या गावांना भेट देऊन सोई-सुविधांची व अडी-अडचणींचा आढावा आ. संजय जगताप यांनी गुरुवारी (दि. 23) घेतला.
निरा (ता. पुरंदर) येथील पालखी तळाची पाहणी केल्यानंतर आ. जगताप पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्याधिकारी विक्रम काळे, सासवडचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सौरभ गांधी, निरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, माजी उपसरपंच दीपक काकडे, ग्रामपंचायत सदस्या माधुरी वाडेकर, माजी सरपंच चंदरराव धायगुडे, ग्रामसेवक मनोज डेरे आदी उपस्थित होते.
माउलींच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांना व वाहनांना पुरंदर तालुक्यातील दौंडज खिंड व पिसुर्टीच्या परिसरातील रस्त्यांवरून जाताना अडचण येऊ शकते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाबाबत आ. संजय जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच वारकर्यांंना चालताना त्रास होणार नाही, याकरिता रस्त्याची योग्य ती रुंदी ठेवण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना त्यांनी सूचना केल्या. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी एक हजार शौचालय व संत सोपानकाकांच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शंभर शौचालय उपलब्ध करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी अमर माने यांनी दिली.
हेही वाचा