पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी सणसर ग्रामपंचायत सज्ज | पुढारी

पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी सणसर ग्रामपंचायत सज्ज

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी सणसर ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम परंपरेनुसार सणसर येथे होत असल्यामुळे सणसर, भवानीनगर परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली आहे. वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी सणसर गावातील पालखीतळावरील झाडांच्या अनावश्यक फांद्या काढण्यात आल्या असून, बाजार कट्ट्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

संपूर्ण गावांमध्ये स्वच्छता करण्यात आली असून, पालखीतळावर डांबरी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मल्टीपर्पज हॉलसमोर हायमास्ट बसविण्यात आले आहेत. पालखीतळावर संपूर्ण स्वच्छता करण्यात आलेली असून, या ठिकाणी मुरमीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालखी सोहळा पावसाळ्यात येत असल्यामुळे पालखीतळावर वीज प्रतिबंधक यंत्र बसविण्यात आले आहे. पालखी मुक्कामानिमित्त येणार्‍या शासकीय कर्मचारी, तसेच बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखीतळावर पालखीच्या दर्शनासाठी गर्दी झाल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालखीतळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सणसरचे सरपंच अ‍ॅड. रणजित निंबाळकर हे सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कंपनी, आरोग्य विभाग व शासनाच्या इतर विभागांकडे पालखी मुक्कामासाठी आवश्यक असणारी कामे पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. या वेळी ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह निंबाळकर, पार्थ निंबाळकर, सागर भाग्यवंत, अनिल शेंडगे, दीपक चव्हाण, धनंजय दुबळे, ग्रामसेवक महादेव पोटफोडे उपस्थित होते.

हेही वाचा

पालखी सोहळ्यासाठी जेजुरीचा नवीन पालखीतळ सज्ज

जालना : श्रीक्षेत्रराजूरचा तलाठी लाचेच्या सापळ्यात

जालना : वाढोना शाळेचे पत्रे उडाली; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शाळा भरतेय मंदिरात !

Back to top button