पुण्यातून नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबादसाठी सेवा; महामंडळाचे पहिल्या टप्प्यात नियोजन

पुण्यातून नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबादसाठी सेवा; महामंडळाचे पहिल्या टप्प्यात नियोजन

प्रसाद जगताप

पुणे : एसटी महामंडळाने आता ग्रीन एनर्जीकडे पाऊल टाकले असून, पहिल्या टप्प्यात पुण्यातून 4 मार्गांवर इलेक्ट्रिक बसची सेवा प्रवाशांना मिळणार आहे. यात पुण्यातून नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद या चार मार्गांवर प्रथमच इलेक्ट्रिक बस धावेल.
पुण्यात नुकतेच राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक एसटीचे उद्घाटन झाले.

यामुळे एसटी आता प्रदूषणविरहित सेवा पुरविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी महामंडळासाठी 3 हजार ई-बस खरेदी करण्याची घोषणा केली आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात दोन ई-बस दाखल झाल्या आहेत. या दोन्ही गाड्या पुणे-नगर मार्गावर सुरू आहेत.

इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची कार्यवाही

सध्या पुण्यातील विभागीय कार्यालयात एकाच ठिकाणी एसटी महामंडळाने चार्जिंग स्टेशन उभारले आहे. अतिरिक्त 50 बस ताफ्यात दाखल झाल्यावर चार मार्गांवर आणि तेथील डेपोंमध्ये एसटी महामंडळाकडून चार्जिंग स्टेशनसह इलेक्ट्रिक एसटीसाठी आवश्यक इन्फ्रास्टक्चर उभारण्यात येणार असल्याचेही चन्ने यांनी सांगितले.

वर्षभरात 3 हजार ई-बस…

पुण्यात राज्यातील पहिल्या ई-बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी एसटीच्या सर्वच्या सर्व बस ग्रीन एनर्जीवर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्याकरिता शासनस्तरावरून वर्षभरात 3 हजार बस खरेदी करण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पात याकरिता तरतूद करण्यात आली आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील 50 ई- बस पुण्यासाठी…

महिना- दीड महिन्यात शासनाच्या फेम-2 या योजनेअंतर्गत 150 ई-बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी 50 ई-बस पुणे विभागाला देण्यात येणार आहेत. या इलेक्ट्रिक गाड्यांतून नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद या चार ठिकाणी प्रवास करता येणार आहे.

1 हजार बस सीएनजीवर करणार

एसटीकडून इंधनावर वर्षाला 3 हजार 400 कोटी रुपये खर्च होतो. गतवर्षी राज्यशासनाने 2 हजार 60 कोटी रूपयांची मदत एसटीला केली होती. सध्याच्या घडीला एसटीच्या इंधनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी एसटी महामंडळ ताफ्यातील डिझेलवरील 1 हजार बसचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन आहे असे चन्ने यांनी यावेळी सांगितले.

फेम-2 योजनेअंतर्गत 150 ई- बस महामंडळाला मिळणार आहेत. त्यापैकी पुणे विभागाला 50 बस देण्यात येणार असून, पुणे विभागातील सोलापूर, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद या मार्गांवर या गाड्या धावतील.

                                   – शेखर चन्ने, उपाध्यक्ष, एसटी महामंडळ

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news