पुणे : ट्रान्सफॉर्मर चोरणारी टोळी जेरबंद

ट्रान्सफॉर्मर चरोांच्या टोळीसह पोलिस
ट्रान्सफॉर्मर चरोांच्या टोळीसह पोलिस

यवत : पुढारी वृत्तसेवा

यवत पोलिसांनी 16 गुन्ह्यांतील फरारी आरोपींसह ट्रान्सफॉर्मर चोरणारी टोळी जेरबंद करण्यात यश मिळवले. 2 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 जानेवारी 2022 रोजी रात्री 11 वाजेपूर्वी खुटबाव (ता. दौंड) येथील शेतजमीन गट नं. 348 मधील प्रताप काळभोर यांचे शेतात असलेली डीपी अज्ञातांनी खाली पाडून त्यातील ऑइल सांडवून नुकसान केले होते. तसेच, त्यातील अंदाजे 100 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा पळविल्या होत्या. याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

राहू येथे सापळा रचून केले अटक

दरम्यान, रविवारी (दि. 29 मे) यवत पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील हवालदार नीलेश कदम व गुरुनाथ गायकवाड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की डीपी चोरणारे संशयित राहू येथे येणार आहेत. त्यामुळे गुन्हे शोध पथक राहू येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सापळा लावून थांबले होते. या वेळी एका मोटारसायकलवरून तीन जण राहू येथील लक्ष्मीआई मंदिराजवळ आले. यवत गुन्हे शोध पथकाने त्यांना मोटारसायकलसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने पाटस, कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भीवर, असे यासह यवत पोलिस ठाणे हद्दीत एकूण 12 रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी अर्जुन दिलीप बर्डे (वय 20, रा. राहुरी रेल्वेस्टेशन झोपडपट्टी, ता. राहुरी, जि. अहमदनगर, सध्या रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली), विकास गौतम बनसोडे (वय 23, रा. नानगाव, ता. दौंड), पांडुरंग ऊर्फ भावड्या मोहन गायकवाड (वय 23, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) यांना अटक केली. त्यांनी तांब्याच्या तारा लईक ऊर्फ लाला मोहम्मद अमीन मणियार (वय 21, रा. चिखली, ता. हवेली, मूळ रा. गोंडा, उत्तर प्रदेश) यास विकल्याने त्यालादेखील अटक करण्यात आली.

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारेचे वितळून तयार केलेले एकूण 300 किलो वजनाचे त्रिकोणी आकाराचे तांब्याचे ठोकळे (किंमत 1 लाख 50 हजार रुपये) व अर्जुन बर्डे याने गुन्ह्यात वापरलेली पॅशन मोटारसायकलसह 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासह त्यांचे इतर 5 साथीदार निष्पन्न केले आहेत. या आरोपींना दौंड येथील न्यायालयाने 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण पवार व पथकाने केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news