

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा
वाढत्या पर्यटकसंख्येमुळे खडकवासला धरण चौपाटीवर वाहने रस्त्याच्या कडेला लावली जातात. या वाहनांमुळे पानशेत रस्त्यावर मोठी कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी चौपाटीवर येत्या तीन महिन्यांत वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
वनखात्याकडून त्याबाबत वेगाने कार्यवाही सुरू केल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. पुणे -पानशेत रस्त्यावरच धरणाच्या चौपाटीवर होणार्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याबाबत दै. 'पुढारी'नेही सातत्याने वृत्त प्रसिद्ध करत येथे वाहनतळाची गरज अधोरेखित केली.
वनखात्याचा हद्दीतील या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासह येथे वाहनतळ उभारण्यात यावा, यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या व माजी जि. प. सदस्या अनिता इंगळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अनिता इंगळे यांनी याबाबत पुन्हा वाहनतळ अभावी चौपाटीवर होणार्या वाहतूक समस्येबाबतची भूमिका मांडत वाहनतळाची गरज अधोरेखित केली. तसेच त्यांनी वनखात्याकडेही पाठपुरावा केला.
अनिता इंगळे म्हणाल्या, 'वाहनतळाबाबत वनखात्याच्या नागपूर विभागाकडून मंजुरी आल्यानंतर कार्यवाही होणार आहे, असे पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.'
धरणाच्या तीरावरील पुणे -पानशेत रस्त्याचा परिसर वनखात्याच्या हद्दीत आहे. चौपाटीवर येणार्या पर्यटकांच्या वाहनांसाठी वनखात्याच्या जागेत वाहनतळ उभारण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष वाहनतळ सुरू होईल.
– प्रदीप सकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे (भांबुर्डा) वनविभाग