

प्रसाद जगताप
पुणे : पीएमपी प्रवाशांनी स्वारगेट चौकात संपूर्ण उन्हाळा उन्हात उभा राहून काढला, आता पावसाळा आला आहे. त्यामुळे आता भिजतच बससाठी उभे राहावे लागणार का? असा प्रश्न या प्रवाशांना पडला आहे. मेट्रोच्या कामामुळे स्वारगेट चौकातील पीएमपीचे महत्त्वाचे थांबे आणि स्थानक हलविण्यात आले आहे. तेव्हापासून येथे प्रवाशांच्या डोक्यावर पुरेसे छप्पर नाही. बसही रस्त्यातच उभ्या राहतात.
त्यामुळे प्रवाशांच्या नाकी नऊ आले आहेत. भर उन्हात प्रवाशांना रस्त्यावरच बसची वाट पाहावी लागत आहे. येथून जाणार्या इतर भरधाव वाहनांमुळे पीएमपी प्रवाशांना अपघात होण्याची शक्यता आहे. पीएमपीकडून येथे एक-दोन छोट्या पत्र्याच्या शेड उभारण्यात आल्या आहेत. मात्र, येथील नियमित प्रवाशांची संख्या पाहता त्या अपुर्या आहेत. या शेड गर्दीने भरत असल्याने ठिकठिकाणी प्रवासी रस्त्यावरच उभे राहत आहेत. परिणामी, ऊन-पावसात प्रवाशांचे हाल होत आहेत.
मेट्रोच्या कामामुळे स्वारगेट चौकात प्रवाशांना थांबण्यासाठी आणि बस उभ्या करण्यासाठी अजिबात जागा राहिलेली नाही. प्रवासी रस्त्यातच उभे राहतात आणि बस रस्त्यातच उभ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे मेट्रोचे काम तातडीने करून प्रवाशांना थांबण्यासाठी छप्पर असलेल्या थांब्यांची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
मला रोज स्वारगेटवरून कामानिमित्त बसने प्रवास करावा लागतो. येथे बसथांब्यासाठी उभारण्यात आलेले शेड नेहमी गर्दीने भरलेले असते. त्यामुळे मला संपूर्ण उन्हाळा उन्हातच उभे राहावे लागले. आता मान्सून केरळात दाखल झाला आहे. काही दिवसांत पुण्यात पाऊस सुरू होईल. तेव्हा आम्ही कुठे उभे राहून बसची वाट पाहायची?
– कुणाल चव्हाण, प्रवासी