

देहूरोड, पुढारी वृत्तसेवा: संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी देहू येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर देहूत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व आवश्यक कामे पूर्ण झाल्यामुळे देहूचे रूपडे पालटले आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच देहूत येत आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण होत आहे.
त्याबरोबरच भागवत धर्माची पताकादेखील ते फडकवणार आहेत. पंतप्रधान दुपारी 1.10 वाजता खास विमानाने लोहगाव विमानतळावर पोहोचणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने झेंडेमळा येथील हेलिपॅडवर उतरतील. त्यासाठी तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. तेथून कारने माळवाडी, परंडवाल चौक, मुख्य कमान मार्गाने 14 कमानीजवळ पोहोचतील. तेथून ते पायी मंदिराजवळ पोहोचतील.
लोकार्पण सोहळ्यासाठी चारशे वारकरी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानंतर पुन्हा कारने ते सभास्थानी येतील. सभेसाठी बावीस एकरात मंडप उभारण्यात आला आहे. चारही बाजूंनी पत्रे लावून मंडप बंद केला आहे. मध्यभागी दोन मोठे मंडप असून डावी आणि उजव्या बाजूकडे दोन लहान मंडप उभारण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराज संस्थान, प्रशासन व नगरपंचायत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची तयारी जय्यत केली आहे.
तसेच, मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. देहू नगरपंचायतीने रस्त्यांची साफसफाई, विजेचे खांब व गटार दुरुस्ती केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या भरून घेतल्या आहेत. सभेच्या ठिकाणाहून हेलिपॅडपर्यंतचा रस्ता डांबरी बनवण्यात आला आहे. मंडपामध्ये 40 हजार भाविकांची बसण्याची सोय आहे. तसेच, या ठिकाणी एलईडी स्क्रीन बसविण्यात आले आहे.
हेही वाचा