प्रकाश आमटे यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान, रुग्णालयात दाखल | पुढारी

प्रकाश आमटे यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान, रुग्णालयात दाखल

पुणे, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना ‘हेअरी सेल ल्युकेमिया’ या रक्ताचा कर्करोगाचे निदान झाले आहे. सध्या त्यांना न्युमोनिया झालेला असून तो नियंत्रणात आणण्यासाठी उपचार सुरू आहेत. प्रकाश आमटे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. कर्करोग सुरवातीच्या टप्प्यात असून त्यांच्यावर कर्करोगावरील औषधोपचार करण्यात येत आहेत.

डॉ. आमटे हे ८ जूनला बी.जे. वैदयकीय महाविद्यालयाच्या एका समारंभाला आले होते. त्यावेळी त्यांना ताप आला होता. दरम्यान त्यांना उपचार व तपासणी करण्यासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आले. तपासणी अंती त्यांना न्युमोनियाचे निदान झाले. तसेच अधिक चाचण्या केल्या असता त्यांना सुरवातीच्या टप्प्यातील रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. सध्या त्यांना विश्रांतीची गरज असून त्यांच्यावर आता न्युमोनियाचे उपचार सूरू आहेत. महिन्याभराने कर्करोगावर उपचार सुरू करण्यात येतील, अशी माहिती लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाचे प्रवक्ते नितीन पवार यांनी दिली.

डॉ. प्रकाश आमटे हे पद्मश्री बाबा आमटे यांचे सुपुत्र असून गेल्या ४९ वर्षांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे महारोगी सेवा समितीच्या “लोकबिरादरी प्रकल्प” या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवत आहेत. दरम्यान डॉ. प्रकाश आमटे यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबुकवर पोस्ट करत डॉ. आमटे यांच्यावर रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत. त्यांना फोन किंवा मेसेज करू नये तसेच भेटायला येऊ नये, असे आवाहन केले आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button