पिंपरी: वय वर्षे 62 आणि 100 वेळा रक्तदान; डॉ. वैद्य यांचे योगदान उभी केली रक्तदान चळवळ

पिंपरी: वय वर्षे 62 आणि 100 वेळा रक्तदान; डॉ. वैद्य यांचे योगदान उभी केली रक्तदान चळवळ

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: वयाच्या अठराव्या वर्षी पहिल्यांदा रक्तदान केले. पण त्यानंतर जे समाधान आणि रक्तदानाचे महत्व कळाले. त्यामुळे रक्तदानाचा हा यज्ञ अखंड सुरू ठेवला आणि वयाच्या 62 व्या वर्षांपर्यंत 100 वेळा रक्तदान केले आहे. रक्तदानाच्या शतकानंतरही पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. वैद्य हे रक्तदान शिबिरे घेणे यापेक्षा ती सातत्याने घेऊन त्यात लोकसहभाग वाढवणे, असे समाजपयोगी काम करत आहेत. डॉ. अविनाश वैद्य हे पॅथॉलॉजिस्ट आहेत. 1990 पासून त्यांनी चिंचवडच्या मंडईजवळ एक छोटेखानी क्लिनीक सुरू केले आहे.

फक्त आपले एक क्लिनीक इतकीच लहान चौकट न ठेवता वैद्य यांनी रक्त संजीवनी नावाची एक एनजीओ सुरू केली आहे. याद्वारे आजवर अडीच लाख दात्यांनी रक्तदान केले आहे. तर आजवर दीड हजाराच्यावर रक्तदान शिबिरे त्यांनी ठिकठिकाणी भरवली आहेत. समाजात असलेली रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान शिबिरे घेणे यापेक्षा ती सातत्याने घेऊन त्यात लोकसहभाग वाढवणे हे त्यांचे ध्येय आहे. आपल्या समाजात असलेली रक्ताची गरज पाहता त्यांना ही रक्त संजीवनीची संकल्पना सुचली.

पण समाजात रक्तदानाबाबत जागृती करण्यासाठीही त्यांनी अनेकप्रकारे कार्य केले आहे. आता या रक्त संजीवनी संस्थेचे नाव श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड असे आहे. या त्यांच्या सगळ्या कामात त्यांची पत्नी मनाली या त्यांना खंबीर साथ देतात. डॉक्टर म्हटले की समाजात वावर आला त्यायोगे जनसंपर्क आला. या जनसंपर्काचा उपयोग योग्यरित्या करुन घेतला आहे.

काय आहे रक्तसंजीवनी

समाजातील वाढती रक्ताची गरज पाहून त्यांनी हा उपक्रम सुरू केला. दरवर्षी अधिकाधिक रक्तदान शिबिरे घेऊन त्यातून रक्ताची गरज भागवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. रक्तदान शिबिरासाठी ते कमीतकमी 1500 जणांना फोन करुन याबाबत कळवतात. त्यातून नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देतात. वैद्य यांनी वयाच्या 18 व्या वर्षी रक्तदान केले. त्यांना खूप समाधान वाटले त्यातून दरवर्षी रक्तदानाचा त्यांचा संकल्प पक्का झाला. आपल्याप्रमाणे इतरांनाही रक्तदानासाठी जागृत करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी स्वत: आजवर 100 वेळा रक्तदान केले आहे. समाजातूनच मदत घेऊन ती समाजाला कशी द्यायची हे वैद्य यांच्याकडून सर्वांनीच शिकायला पाहिजे. वैद्य यांनी अनेक उपक्रम घेऊन त्याचा समाजाला कसा फायदा होईल, असा विचार केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news