पिंपरी : पोपट विक्रीप्रकरणी कारवाईची मागणी

पिंपरी : पोपट विक्रीप्रकरणी कारवाईची मागणी

दापोडी : खडकी, दापोडी, पुणे विद्यापीठ परिसरात असलेल्या मोठ्या झाडांच्या ढोलीत पोपटांनी वास्तव्य केले आहे. मात्र, पोपटाची पिल्ले तारेच्या आकड्यांच्या साहाय्याने काढताना झाडावरून खाली पडून मरत आहेत आणि जी जिवंत राहिली आहेत. त्यांची खडकी, शिवाजीनगर परिसरात अवैधरित्या विक्री केली जाते. पोपटांच्या पिल्लांचे हाल करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी छावा मराठा संघटनेने केली आहे.

माणसांच्या हौशीखातर आयुष्यभर पिंजर्‍यात फडफडणारे पोपट मिठू-मिठू करत मरून जातात. पोपटांची पिल्ले पकडून त्यांची विक्री करणार्‍यांचे रॅकेटही मोठे आहे. या पार्श्वभूमीवर पोपट विक्री करणार्‍यांविरुद्ध वन विभाग कारवाई केल्याचे भासवते; पण दापोडी, औंध रोड, खडकी, पुणे विद्यापीठ परिसरात वन विभागाने दररोज गस्त घालणे आवश्यक आहे.

पोपट विक्रेत्यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. झाडांवरून पोपट पकडणार्‍यांना स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला तर त्यांना उद्धटपणे अर्वाच्य भाषा ऐकावी लागते. त्यामुळे स्थानिक नागरिकांची इच्छा असूनही पोपटांच्या पिल्लांचा जीव वाचवता येत नाही. अनेकदा झाडांच्या पोपळ्यांमधून पोपटाची पिल्ले काढताना ती खाली पडतात आणि जीव जातो. मोठे पोपट या झाडावरून त्या झाडावर जीवाच्या आकांताने आवाज काढतात; पण ही नवजात पिल्ले घेऊन जाताना निर्ढावलेल्या लोकांवर काही परिणाम होत नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.

छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की सूचीबद्ध प्राणी आणि पक्ष्यांना घरात पाळण्यापूर्वी वन विभागाची परवानगी अनिवार्य आहे. परंतु, पोपट पाळण्यासाठी वन विभागाने परवानगी दिलेली नाही. पोपट हा पक्षी राष्ट्रीय संपत्ती असून, त्याला मुक्त संचाराचा हक्कक आहे. त्याचे आयुष्य पिंजर्‍यात बंद करणे हा गुन्हा असल्याने पोपटाला पिंजर्‍यात ठेवणार्‍यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची
आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news