पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याकरिता आपत्कालीन नियंत्रणासाठी अधिकारी व कर्मचार्यांना ग्रुप कमांडर म्हणून नेमण्यात आले आहे. आकुर्डीतील पालखी मुक्काम व मार्गावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि.17) सांगितले.
दोन्ही पालखीचे मंगळवारी (दि.21) व बुधवारी (दि.22) शहरात आगमन होत आहे. पालखी सोहळ्यात सोयी व सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे मुख्य समन्वयक असून, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी उपायुक्त विठ्ठल जोशी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी उपायुक्त सचिन ढोले हे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.
कार्यकारी अभियंता थॅामस नर्होना व ओमप्रकाश बहिवाल हे नोडल ऑफिसर आहेत. ग्रुप कमांडर हे आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे प्रमुख असणार आहेत. गु्रप कमांडरच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत. गु्रप कमांडरला पालखी मार्गाची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. निगडी ते दापोडी आणि आळंदी मार्ग ते दिघी गावठाणापर्यंत मार्गावर हे पथक कार्यरत असणार आहे.