पाणी 15 जुलैपर्यंत पुरवणार; पुणेकरांसाठी जलसंपदा विभागाचे नियोजन
पुणे : पुढारी वृत्तसेवा
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात या वर्षी मागील वर्षापेक्षा 2.2 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी आहे. तरीदेखील शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. पुणे शहरास खडकवासला साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या या चारही धरणांत मिळून एकूण 5.80 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
मागील वर्षी याच दिवशी चारही धरणांत आठ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता. या वर्षी तीव्र उन्हाच्या झळांमुळे बाष्पीभवन, पाणीचोरी, पाणीगळती आणि पाण्याची जास्त मागणी, यामुळे पाण्याचा जास्त वापर झाला. परिणामी, मागील वर्षीच्या तुलनेत 2.2 टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.
याबाबत माहिती देताना खडकवासला पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, 'खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये 19.88 टक्के पाणीसाठा म्हणजेच 5.80 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच या तारखेपर्यंत चारही धरणांत आठ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. गेल्या वर्षी परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्याने सुरुवातीपासून खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात दोन टीएमसी पाणीसाठा कमीच होता.
त्यामुळे आता 15 जुलैपर्यंत पिण्याचे पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत पुणेकरांना दरमहा दीड टीएमसी पाण्याची गरज भासते. दीड महिन्यासाठीचे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर उर्वरित पाणी शेतीसाठी सोडण्यात येईल.'
'जलसंपदा विभागाच्या नियमानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येते. त्यानंतर शेती, औद्योगिक तसेच अन्य उद्दिष्टांसाठी पाणी देण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानुसार 15 ऑक्टोबरनंतर रब्बी हंगामात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी देण्यात येणार्या पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून दरवर्षी करण्यात येते. त्यानुसार सद्य:स्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणात असलेल्या शिल्लक पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे,' असेही पाटील यांनी सांगितले.
पुरेशा पाणीपुरवठ्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होईपर्यंत शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाने शहरासाठी 15 जुलैपर्यंत पाणी राखून ठेवले आहे.
धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत
टेमघर 0.01 (0.18), वरसगाव 2.71 (21.14), पानशेत 2.35 (22.04), खडकवासला 0.85 (42.84), भामा आसखेड 2.67 (34.84) आणि पवना 2.18

