पंचकेदार मंदिरात ‘दगडूशेठ’चे बाप्पा; गणेशोत्सवात साकारणार प्रतिकृती

पंचकेदार मंदिरात ‘दगडूशेठ’चे बाप्पा; गणेशोत्सवात साकारणार प्रतिकृती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून, त्यात 'दगडूशेठ'चे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.
कोरोनामुळे सलग दोन वर्षे गणेशोत्सवात मुख्य मंदिरातच गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत होती.

मात्र, यावर्षी उत्सव मंडपात गणरायाची मूर्ती विराजमान होणार असून, दोन वर्षांनंतर उत्सवमंडपात गणेशोत्सव साजरा होणार आहे. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा प्रारंभ शिल्पकार विवेक खटावकर व वैशाली खटावकर यांच्या हस्ते पार पडला. ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, मुरलीधर लोंढे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

श्री पंचकेदार मंदिर हे हिमालयाच्या सानिध्यात असलेल्या आणि पवित्र असलेल्या भगवान शंकराच्या पंचकेदार मंदिराची प्रतिकृती आहे. प्रत्यक्ष महादेवाचा निवास असलेल्या पाच शिवमंदिरांचा हा समूह श्री पंचकेदार मंदिर नावाने प्रसिद्ध आहे. ही पाच मंदिरे उत्तराखंडमधील गढ़वाल येथे स्थित असून, शिवशंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या नावांनी प्रसिद्ध आहेत.

या मंदिर समूहाचे दर्शन गणेशोत्सवात घडेल. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 100 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 81 फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरून त्यानंतर रंगकाम करण्यात येईल. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवेदेखील बसविण्यात येणार आहेत. सजावट विभागात 40 कारागीर कार्यरत राहणार असून,

त्यानंतर राजस्थानमधील कारागीर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news