पुणे : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक न्यास नोंदणी तथा धर्मादाय सहआयुक्त कार्यालय पुणे विभागाच्या नावाने बनावट लेटर पॅड तयार करून धर्मादाय आरोग्य सेवक म्हणून नियुक्तीपत्रे पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टपालाद्वारे ही नियुक्तीपत्रे पाठविण्यात आली आहेत. पत्र मिळालेल्या तीन व्यक्ती चौकशीसाठी जेव्हा कार्यालयात आल्या तेव्हा हा प्रकार उजेडात आला.
बनावट लेटर पॅड, कार्यालयातील अधिकार्यांच्या बनावट सह्या करून कार्यालयाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधीक्षक, रुग्णालय सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे विभागातील क्रांती जाधव (वय 45) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 17 मे ते 1 जून 2022 या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंंबईच्या धर्मादाय कार्यालयाकडून यापूर्वी धर्मादाय आरोग्य सेवक म्हणून नियुक्तीपत्रे दिली जात होती. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ही नियुक्तीपत्रे देणे बंद आहे. असे असताना अक्षय नाझीरकर (रा. नाझरे कडेपठार, ता. पुरंदर), किशोर चौधरी, संतोष चौधरी (रा. दोघे मुपो. खोर, ता. दौंड) या तिघांना टपालाद्वारे नियुक्तीपत्रे मिळाली होती.
दरम्यान तिघे पुणे येथील सहआयुक्त कार्यालयात चौकशीसाठी आले तेव्हा कार्यालयाकडून अशी कोणतीही नियुक्तीपत्रे पाठविण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. ही नियुक्तीपत्रे बनावट लेटर पॅडवर तयार केलेली असून, त्यावर या कार्यालयातील एका अधिकार्याची सही आहे. त्यानंतर फिर्यादी महिला अधिकार्यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजी नाईक करत आहेत.
हेही वाचा