चोर दरवाजाचा चढ, तर संजीवनी माचीचा उतार

चोर दरवाजाचा चढ, तर संजीवनी माचीचा उतार
Published on
Updated on

राजेंद्र खोमणे

नानगाव : वेल्हे तालुक्यातील गुंजवणे गावातून, तसेच पाली खुर्द गावातून दोन अवघड वाटा गडावर जातात. गुंजवणे मार्गाने चोर दरवाजा वाट जाते, तर पाली खुर्दमधील वाट गडाच्या मुख्य पाली दरवाजापर्यंत पोहोचते. पर्यटक व गडप्रेमी भटकंती करताना दोन्ही दरवाजांचा वापर करीत गडावर पोहोचतात. ही दोन्ही गावे राजगडच्या पायथ्याला व सह्याद्रीतील रांगेच्या कुशीत बसलेली आहेत. गावे जरी छोटी असली, तरी ग्रामस्थ मोठ्या मनाचे असल्याने कोणालाही अडचण येत नाही.

घसरड्या वाटेने, दगडातून, जंगलातून जाणारा गुंजवणी मार्ग हा चोर दरवाजात घेऊन जातो. अनेक चढ-उतार व अडथळे पार करत जावे लागते. या मार्गाने गडावर जाणार्‍यांची संख्या जास्त आहे, तर पाली मार्गदेखील पाऊलवाट व जंगलातून जातो. या मार्गावर मोठमोठ्या शिवकालीन पायर्‍या आहेत. त्यामुळे आदीच दमछाक झाल्याने पायर्‍यांचा मार्ग आणखीच दमछाक करतो. चोर दरवाजा मार्ग थोडा चढ, थोडा सपाट आहे. मात्र, पालीचा मार्ग सरळ डोंगराच्या सोंडेवरून जाणारा असल्याने तितकाच दमछाक करणारा आहे.

त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार रस्त्याची निवड करून दरवाजात पोहोचतात. चोर दरवाजा हा गडाच्या तटबंदीत लपलेला असून, छोटा आकाराचा गुप्त दरवाजा आहे. पाली दरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा असून, भव्यदिव्य आहे. पाली दरवाजादेखील जवळ जाईपर्यंत दिसत नसल्याने तोदेखील वेगळ्या पद्धतीने बांधण्यात आला आहे. अनेक पायर्‍या वर चढत गेल्यावर गडाचा मुख्य दरवाजा महाद्वार नजरेस पडतो व त्यामधून आपण गडावर प्रवेश करतो.

मात्र, चोर दरवाजा हा गडाचा गुप्त दरवाजा असून, तो जवळ गेल्यावरच दिसतो. गडावर अचानक हल्ला झाला, तर गडावरील सर्वांना या मार्गाने सुखरूप बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असावा, त्यामुळेच त्याला चोर किंवा गुप्त दरवाजा म्हटले आहे.

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि कायमची राजधानी रायगड हा 125 किलोमीटरचा प्रवास प्रत्येक शिवप्रेमीला पर्वणीच ठरेल असा आहे. सह्याद्रीचे डोंगर, दर्‍या, जंगल, पाऊलवाट तुडवत होणारा हा प्रवास स्वर्गसुखाचा आनंद देणारा नयनरम्य असा आहे. या प्रवासातील चित्तथरारक प्रसंग, इतिहासाच्या पाऊलखुणा दाखविणार्‍या वास्तू,नैसर्गिक वैशिष्ट्ये या संबंधीची मालिका…

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news